लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी खळबळजनक दावा केला आहे. राहुल गांधी यांनी संसदेत बजेटवरील चर्चेच्या दरम्यान 'चक्रव्यूह' भाषण केलं होतं. या भाषणानंतर त्यांच्या विरोधात अंमलबजावणी संचालनालय (ED) कडून धाड टाकण्याची योजना तयार होत आहे. राहुल यांनी सांगितलं की, मी ईडीच्या अधिकार्यांचं सहर्ष स्वागत करत आहे.
राहुल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत म्हंटलं आहे की, 'उघड आहे 2 पैकी 1 ला माझं चक्रव्यूहचं भाषण आवडलेलं नाही. मला ईडीच्या अंतर्गत सूत्रांनी धाड टाकण्याची तयारी सुरु असल्याची माहिती दिली आहे. मी ईडीची वाट पाहात आहे. चहा आणि बिस्कीट माझ्याकडून... इतकंच नाही तर राहुल यांनी या ट्विटमध्ये ED च्या अधिकृत हँडलला टॅग देखील केलं आहे.
राहुल गांधी यांच्या या आरोपांना केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी उत्तर दिलंय. राहुल यांनी त्यांना माहिती देणाऱ्या ईडीच्या अधिकाऱ्याचं नाव सांगावं, असं आव्हान सिंह यांनी दिलंय. त्यांनी विरोधी पक्षनेत्यानं केलेलं हे वक्तव्य लाजीरवाणं असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
काय होतं चक्रव्यूह भाषण?
राहुल गांधी यांनी लोकसभेत बजेटवरील चर्चेत भाषण करताना केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती. 'त्यांनी भारतीय नागरिकांना भाजपानं चक्रव्युहमध्ये अडकवलं आहे, असा त्यांनी आरोप केला. महाभारतामध्ये अभिमन्यूबरोबर जे झालं होतं, तेच आज भारतीयांसोबत केलं जात आहे, असा त्यांनी दावा केला.'
( नक्की वाचा : SC/ST मध्ये 'कोटा' अंतर्गत 'कोटा', सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयाचा अर्थ काय? )
देशातील नागरिकांना भाजपानं एका चक्रव्युहात अडकवलं आहे. चक्रव्युहाचं आणखी एक रुप आहे, पद्मव्यूह जे लोटसव्यूहमध्ये होतं. हे व्यूह 6 जणं नियंत्रित करत आहेत. या बजेटमध्ये सरकारनं मध्यमवर्गाचा विश्वासघात केलाय. आता मध्यमवर्ग सरकारची साथ सोडून 'इंडिया' आघाडीसोबत येत आहे,' असं राहुल यांनी भाषणात म्हंटलं होतं.