VIDEO: बॅडमिंटन खेळता खेळता काळाचा घाला! व्यावसायिकाचा हार्टअटॅकने अंत

Viral Video : रायपूरमध्ये हार्डवेअर व्यावसायिक अमृत बजाज यांचा बॅडमिंटन खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. शटल कॉक उचलण्यासाठी वाकले असता ते अचानक जमिनीवर कोसळले.

जाहिरात
Read Time: 2 mins

छत्तीसगडची राजधानी रायपूरमधून एक धक्कादायक आणि काळजाचा ठोका चुकवणारी घटना समोर आली आहे. बॅडमिंटन खेळता खेळता एका 57 वर्षीय व्यावसायिकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. या संपूर्ण घटनेचा थरार मैदानावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अमृत बजाज असं मृत हार्डवेअर व्यावसायिकाचं नाव आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, अमृत बजाज हे दररोजप्रमाणे आपल्या मित्रांसोबत बॅडमिंटन खेळण्यासाठी गेले होते. बराच वेळ खेळल्यानंतर त्यांनी एक शॉट मारला. त्यानंतर समोर पडलेली शटल कॉक उचलण्यासाठी ते खाली वाकले. 

मात्र, त्याच क्षणी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि ते डोळ्याची पापणी लवते न लवते तोच जमिनीवर कोसळले. त्यांना मैदानावर कोसळताना पाहून त्यांचे मित्र आणि उपस्थित लोक त्यांच्याकडे धावले. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

VIDEO

Advertisement

मधुमेह असूनही व्यायामाची आवड

अमृत बजाज हे ईदगाह भाठा परिसरातील रहिवासी होते. त्यांच्या पश्चात कुटुंबात मोठा शोक व्यक्त केला जात आहे. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, बजाज हे मधुमेहाचे रुग्ण होते. मात्र, आरोग्याप्रती जागरूक असल्याने ते दररोज सकाळी मित्रांसोबत व्यायाम आणि बॅडमिंटन खेळायला जात असत.

वाढत्या 'कार्डियाक अरेस्ट'ची भीती

गेल्या काही काळापासून व्यायाम करताना किंवा खेळताना हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. तज्ज्ञांच्या मते, अतिश्रम किंवा शरीराची क्षमता नसताना केलेला तीव्र व्यायाम अशा घटनांना कारणीभूत ठरू शकतो.

Advertisement