Haribhau Bagde Rajasthan Governor news: भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या विरोधात सध्या राजस्थानात राजकीय असंतोष आहे. महाराष्ट्राच्या शाळांमध्ये हिंदी भाषेच्या सक्तीसाठी आग्रही असल्याचा आरोप सत्तारुढ भाजपावर नेहमीच होत असतो. त्याचवेळी राजस्थानच्या राज्यपालांच्या मराठी प्रेमामुळे तेथील भाजपा सरकार अडचणीत आले आहे.
काय आहे प्रकरण?
राजस्थानचे राज्यपा हरिभाऊ बागडे यांनी घेतलेल्या एका निर्णयामुळे राजस्थानच्या राजकारणात मोठा भूकंप आला आहे. बागडे यांनी त्यांच्या पदसिद्ध अधिकारांचा वापर करत राजस्थान विद्यापीठाचे कुलपती या नात्याने विद्यापीठात विशेष मराठी स्टडी सेंटर उभारण्याचे निर्देश दिले होते.
मराठी भाषा, तिचे साहित्य आणि संशोधनाला प्रोत्साहन देणे हा यामागील हेतू असल्याचे सांगण्यात आले. मात्र, या निर्णयाची माहिती मिळताच राजस्थानमधील स्थानिक संघटना, तरुण आणि विद्यार्थी गट कमालीचे आक्रमक झाले असून त्यांनी याविरोधात मोठे आंदोलन पुकारले आहे.
( नक्की वाचा : राज्यातील 3 मोठ्या तीर्थक्षेत्रांचा चेहरामोहरा बदलणार! फडणवीस सरकारकडून 115 कोटींचा निधी मंजूर )
स्थानिकांचा तीव्र विरोध आणि पुतळे दहन
राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या या भूमिकेमुळे भडकलेल्या आंदोलकांनी राजस्थान विद्यापीठ परिसर आणि विविध भागांत जोरदार निदर्शने केली. आंदोलकांनी थेट राज्यपालांचे पुतळे आणि छायाचित्रे जाळून आपला तीव्र संताप व्यक्त केला.
राजस्थानची स्वतःची समृद्ध संस्कृती आणि राजस्थानी भाषा असताना त्याला डावलून दुसऱ्या राज्याची मराठी भाषा जबरदस्तीने का लादली जात आहे, असा थेट सवाल स्थानिक संघटनांनी उपस्थित केला आहे. हा राजस्थानच्या भूमीचा आणि संस्कृतीचा अपमान असल्याचा आरोप करत आंदोलकांनी हा निर्णय मागे घेण्याची जोरदार मागणी केली आहे.
( नक्की वाचा : Success Story: सलग 3 वेळा UPSC मध्ये फेल! मग बदलली 'ती' एक सवय अन् वयाच्या 24 व्या वर्षी झाली अधिकारी )
महाराष्ट्रातील राजकारणाशी कनेक्शन
या संपूर्ण वादाचे सर्वात महत्त्वाचे आणि राजकीय पदर महाराष्ट्राशी जोडलेले आहेत. महाराष्ट्रात गेल्या 8 ते 10 महिन्यांपासून शालेय अभ्यासक्रमात हिंदी भाषेचा समावेश करण्याच्या भाजप सरकारच्या धोरणाला विरोधक आणि स्थानिक संघटना कडवा विरोध करत आहेत.
महाराष्ट्रात हिंदीचा पुरस्कार करणाऱ्या भाजपला आता राजस्थानसारख्या राज्यात मराठी भाषेचे केंद्र सुरू करताना तेथील स्थानिकांच्या प्रचंड रोषाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे भाषेच्या मुद्द्यावरून भाजपची दोन्ही राज्यांत दोन वेगळी आणि परस्परविरोधी रूपे समोर आल्याची टीका राजकीय वर्तुळातून केली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world