कोरोना व्हायरस पुन्हा एकदा हात पाय पसरत असल्याचं दिसून येत आहे. गुरुवारी अयोध्येतील चार जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे. यामध्ये रामजन्मभूमी परिसरातील एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे. यामध्ये रुग्णालयातील एक नर्सला देखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे. अयोध्या जिल्ह्यातील निवासी दोघांना संक्रमण झालं आहे. ज्यांच्यावर लखनऊमधील रुग्णालयात उपचार सुरू आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंता वाढली आहे. अयोध्येत रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आला आहे. रामजन्मभूमीपासून रुग्णालय, बस डेपोसह दहाहून अधिक ठिकाणांवर वैद्यकीय टीमकडून कोरोना तपासणी केली जात आहे. अयोध्येत कोरोना रुग्ण आढळल्यानंतर प्रशासन कामाला लागलं आहे. रुग्णालयातील खाटा कोरोना रुग्णांसाठी आरक्षित ठेवली जात आहे. याशिवाय सर्वांना मास्क घालण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.
नक्की वाचा - Navi Mumbai : नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्याची आत्महत्या; प्राचार्याविरोधात गुन्हा दाखल
मुंबईत कोरोनाचे 102 नवे रुग्ण
महाराष्ट्राबद्दल सांगायचं झालं तर राज्यात शुक्रवारी कोरोनाचे 102 नवे रुग्ण सापडले आहेत. यामुळे रुग्णांची संख्या 1 हजार 914 वर पोहोचली आहे. तर मुंबईतील रुग्णांची संख्या 805 इतकी झाली आहे. राज्यामध्ये शुक्रवारी कोरोनामुळे चौघांचा मृत्यू झाला असून ही संख्या 25 वर पोहोचली आहे. हे मृत्यू सातारा, कोल्हापूर, उल्हासनगर आणि मुंबईमध्ये झाले आहेत. शुक्रवारी सापडलेल्या 102 रुग्णांमध्ये 27 मुंबई पालिकेच्या हद्दीत तर पुण्यात पालिकेच्या हद्दीत 26 रुग्ण सापडले.