Ratan Tata passes away : रतन टाटा आता आपल्यात नाहीत. पण, त्यांचं साधं आयुष्य सर्वांसाठीच एक उदाहरण होतं. जगातील मोजकेच धनाढ्य उद्योगपती आजीवन अविवाहित होते. रतन टाटांचा त्यामध्ये समावेश होतो. टाटांच्या आयुष्यातही दोन महिला आल्या होत्या. पण, परमेश्वराच्या मनात काही वेगळंच होतं. त्यांचं लग्न काही कारणांमुळे झालं नाही.
पहिलं प्रेम
फेसबुक पेज 'ह्यूमन्स ऑफ बॉम्बे' शी बोलताना टाटा यांनी याबाबत माहिती दिली होती. टाटा यांनी तीन भागांच्या या चर्चेत स्वत:च्या आयुष्याबाबत माहिती दिली. त्यांचं लहाणपण सुखात गेलं. पण, आई-वडिलांचा घटस्फोटामुळे त्यांना आणि त्यांच्या भावाला थोडा त्रास सहन करावा लागला. या चर्चेच्या दरम्यान टाटा यांनी त्यांच्या आजीची आठवणही सांगितली. आजींनी त्यांना कसे संस्कार दिले हे, त्यांनी सांगितलं.
टाटांनी त्या आठवणीबद्दल सांगितलं की, 'दुसरं महायुद्ध संपल्यानंतर आजी मला आणि माझ्या भावाला उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी लंडनला घेऊन गेली. तिनं माझ्यावर संस्कार केले. काय करावं, काय करु नये याबाबत शिकवलं. प्रतिष्ठा ही सर्वात महत्त्वाची आहे, हे तिनं माझ्यावर बिंबवलं.
मला शिक्षणासाठी अमेरिकेतली कॉलेजमध्ये जायचं होतं. पण, मी लंडनला जावं अशी वडिलांची इच्छा होती. मला आर्किटेक्ट व्हायचं होतं. तर ते इंजिनिअर हो असं म्हणत होते. आर्किटेक्ट झाल्यानं त्यांचे वडील नाराज झाले होते. त्यामुळे रतन टाटा यांनी अमेरिकेतली लॉस एंजेलिस शहरात नोकरी केली. त्यांनी तिथं दोन वर्ष काम केलं.
('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आणि नातं तुटलं...
रतन टाटा लॉस एंजेलिसमध्येच असताना त्यांचं एका मुलीवर प्रेम होतं. ते त्या मुलीबरोबर लग्न करणार होते. पण त्याचवेळी त्यांच्या आजीची तब्येत बिघडली. त्यांनी भारतामध्ये परत जाण्याचा निर्णय घेतला. ज्या मुलीवर टाटांचं प्रेम होतं ती देखील त्यांच्याबरोबर भारतामध्ये येईल, असं त्यांना वाटत होतं. पण, तसं झालं नाही. ते 1962 साल होतं. त्यावेळी भारत-चीन युद्ध सुरु होतं. त्यामुळे त्या मुलीचे आई-वडील तिला भारतामध्ये पाठवण्यासाठी तयार नव्हते. त्यामुळे अखेर त्यांचं नातं तुटलं.
( नक्की वाचा : Ratan Tata Demise : धडाडीचा मात्र कनवाळू उद्योगपती हरपला, पंतप्रधान मोदींनी वाहिली श्रद्धांजली )
'ती' वेळ आलीच नाही
अभिनेत्री सिमी गरेवाल आणि रतन टाटा यांचंही एकमेकांवर प्रेम होतं. रतन टाटा यांनी स्वत: त्यावर कधी उघडपणे चर्चा केली नाही. पण सिमी गरेवालनं याबाबत उघडपणे चर्चा केली होता. दोघांनी बराच काळ एकमेकांना डेट केलं. ते लग्न देखील करणार होते. पण, काही कारणांमुळे ते होऊ शकलं नाही. रतन टाटा यांनी सिमी गरेवाल यांच्या टॉक शोमध्ये देखील गेले होते. त्यावेळी देखील हा विषय निघाला होता.
कुटुंब नसल्यानं कधी-कधी एकटं वाटतं असं मत टाटा यांनी व्यक्त केलं होतं. त्यावर सिमी यांनी अजूनही उशीर झालेला नाही, अशी प्रतिक्रिया दिली. रतन टाटा यांनी त्याला कधीही उशीर होत नसतो, असं उत्तर दिलं. पण, शेवटपर्यंत टाटा याबाबत निर्णय घेऊ शकले नाहीत.
( नक्की वाचा : रतन टाटांबद्दलच्या या 10 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का ? )
शेवटपर्यंत सक्रीय
रतन टाटा शेवटपर्यंत अॅक्टिव्ह होते. 20 मे 2024 रोजी लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी मतदान केलं होतं. रतन टाटांना कुत्री, विमान प्रवास आणि पियोनो वाजवण्याचा छंद होता. त्यांनी निवृत्तीनंतर छंद म्हणून पुन्हा एकदा पियानो वाजवण्याचा छंद जोपासला होता, पण, त्याला फार वेळ देता आला नाही, असं त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर म्हंटलं होतं.