150 वर्षांच्या टाटा उद्योगसमूहाची धुरा समर्थपणे पेलणाऱ्या रतन टाटा यांचं वयाच्या 86 व्या वर्षी निधन झालं. सचोटी आणि विश्वासाच्या भक्कम पायावर उभी असलेली भारताची निरलस उद्यमशीलता म्हणते 'टाटा'. देशात विश्वासार्ह आणि प्रामाणिक उद्यमशीलता आणणाऱ्या टाटा कुटुंबातील रतन टाटांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला.
नक्की वाचा : रतन टाटांबद्दलच्या या 10 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का ?
नुसेरवानजी टाटांनंतर जमशेटजी नुसेरवानजी टाटा, सर दोराबजी जमशेटजी टाटा आणि शेवटचे सर रतनजी जमशेटजी टाटा. जमशेटजी टाटा हे टाटा उद्योगसमुहाचे संस्थापक. सद्यस्थिती टाटाची उलाढाल एक लाख कोटींच्या घरात आहे. त्यांचे पूर्वज पारशी धर्मगुरू होते. मात्र त्याहून वेगळी वाट धुंडाळत ते उद्योग क्षेत्रात उतरले. स्टील इंडस्ट्रीचा पायाही जमशेटजी टाटा यांनीच घातलेला आहे. नुसेरवानजी, जमशेटजी टाटा यांनी टाटा उद्योगसमूहाचा केवळ पाया रचला नाही तर त्यांना भारतीय उद्योगसृष्टीचे भीष्मपितामहही म्हटले जाते. त्यांच्याच पावलांवर पाऊल ठेवत रतन टाटा यांनी टाटा उद्योग वाढवला.
नक्की वाचा : टाटांचा जबरा फॅन! त्याची एक कृती अन् लाखो मनं जिंकली
रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी मुंबईतील टाटा या पारशी कुटुंबात झाला. त्यांचं प्राथमिक शिक्षण मुंबईत झालं. महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी न्यूयॉर्क सिटीतील रिव्हरडेट कंट्री शाळेत घेतलं. सुरुवातीच्या काळात ते टाटा एअरलाइन्स आणि टाटा इंडस्ट्रीजमध्ये विविध जबाबदाऱ्या पार पाडत होते. 1991 ते 2012 या काळात त्यांनी टाटा समूहाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी लीलया पेलली. ऑक्टोबर 2016 ते फेब्रुवारी 2017 टाटा समूहाचे अंतरिम अध्यक्ष होते. 2000 मध्ये त्यांना पद्मभूषण आणि 2008 मध्ये त्यांना पद्मविभूषण देऊन गौरव करण्यात आला होता. सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबाचं चारचाकी गाडीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक लाखाची नॅनो कार तयार करण्याची संकल्पना तयार करून ती प्रत्यक्षात आणली.
रतन टाटा यांच्या निधनामुळे भारतीय उद्योग क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. उद्योगाला सेवाभावी वृत्तीची झालर असलेला उद्योगपती होणे दुर्मीळ असल्याने रतन टाटा यांच्या निधनामुळे देशभरात शोककळा पसरली आहे.