भारतात आज 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. या खास दिवशी इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलं आहे. राष्ट्रपती सुबियांतो गरुवारी रात्री दिल्ली विमानतळावर पोहोचले होते. यावेळी परराष्ट्र राज्यमंत्री पावित्रा मार्गेरिटा यांनी त्यांचं स्वागत केलं. त्यांच्यासोबत इंडोनेशियाचं एक शिष्टमंडळदेखील भारतात आले आहेत. या प्रतिनिधीमंडळाने शनिवारी राष्ट्रपती भवनात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याच्या चित्रपटातील एक गाणं गायलं.
इंडोनेशियाच्या प्रतिनिधीमंडळाने गायलं बॉलिवूड गाणं...
इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात भोजनाचं आयोजन केलं होतं. यादरम्यान इंडोनेशियातून आलेल्या शिष्टमंडळाने शाहरुख खानचं कुछ कुछ होता है हे गाणं गायलं. त्यांच्या गाण्याचं अनेकांकडून कौतुक केलं जात आहे. या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
यापूर्वी शनिवारी प्रबोवो सुबियांतो यांनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीनंतर दिल्लीच्या हैदराबाद भवनमध्ये पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांच्या दरम्यान विविध करार करण्यात आले. परराष्ट्र मंत्रालयातील सचिव (पूर्व) जयदीप मजुमदार यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं, राष्ट्रपती सुबियांतो यांनी भारतीय कंपन्यांना बंदरे, विमानतळ आणि रेल्वे यासह पायाभूत सुविधांच्या जवळपास सर्वच क्षेत्रात गुंतवणूक करण्याचं आवाहन केलं आहे.