रुपेश सामंत
गोव्यातील पाली धबधब्यावर अडकेल्या जवळपास 80 पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे. एक मोठ्या बचाव मोहीमेनंतर अडकलेल्या सर्व पर्यटकांना यशस्वी पणे बाहेर काढण्यात आले आहे. गोवा अग्निशमन आणि आपत्कालीन सेवांनी राज्य पोलिसांसह,रविवारी पाली धबधब्यावर अडकलेल्या सर्व 80 लोकांना वाचवले आहे. उत्तर गोवा पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी ही माहिती दिली आहे. सर्व 80 जणांना वाचवण्यात यश आले असून या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
गोव्यातही पावसाचा जोर वाढला आहे. पर्यटक या काळातही बाहेर पडत आहेत. गोव्यातील पाली धबधबा प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात अनेक पर्यटक इथे येत असतात. रविवारीही इथे पर्यटक आले होते. त्यातील अनेक जण पाण्यात गेले होते. पाली धबधब्याला भेट देणारे सर्व लोक पाण्याचा प्रवाह वाढल्याने अडकून तिथे पडले होते. धबधब्यापर्यंत जाण्यासाठी जी नदी ओलांडून जावी लागते ती देखील दुथडी भरून वाहत होती.
ट्रेंडिंग बातमी - कोकणात मुसळधार! राजापूर शहराला पुराचा वेढा, सिंधुदुर्गातही पावसाची जोरदार बॅटींग
घाबरलेल्या लोकांनी वाल्पोई पोलिस स्टेशनला मदतीसाठी हाक दिली. त्यानंतर बचावकार्य सुरू करण्यात आले.अक्षत कौशल यांनी सांगितले की दुपारपर्यंत 50 जणांना वाचवण्यात यश आले. तर बाकीच्या 30 जणांना संध्याकाळ पर्यंत बाहेर काढण्यात आले. गोव्यात रविवारी संततधार पाऊस सुरूच होता. भारतीय हवामान खात्याने राज्यासाठी मंगळवारपर्यंत रेड अलर्ट जारी केला आहे.
ट्रेंडिंग बातमी - वेळ आली होती पण..., नदीच्या पुरात 'ती' अडकली, त्या दोघांनी कमाल करून दाखवली
मुसळधार पावसाच्या अंदाजाने राज्याच्या शिक्षण विभागाने सोमवारी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. राज्याचे शिक्षण संचालक शैलेश झिंगाडे यांनी सर्व शाळांना सुट्टी बाबतचे परिपत्रक जारी केले आहे. दरम्यान धोकादायक ठिकाणी जावू नये असे सर्वांनाच सांगण्यात आले आहे. गरज नसल्यास घराबाहेर पडू नका अशा सुचनाही करण्यात आल्या आहे.