RSS Chief Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) च्या 100 वर्षांच्या पूर्तीनिमित्त (शताब्दी वर्ष) राजधानी दिल्लीमध्ये विशेष व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आहे. यामधील पहिल्या व्याख्यानात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणाले की, संघाची सार्थकता भारताच्या विश्वगुरू बनण्यात आहे. भारताला जगाला योगदान द्यायचे आहे आणि आता ती वेळ आली आहे. यावेळी त्यांनी रा.स्व. संघाला अभिप्रेत असलेल्या हिंदू राष्ट्राचा अर्थही सांगितला.
सरसंघचालकांनी या व्याख्यानात सांगितलं की, भारत दोन मोठ्या गुलामींना तोंड देऊन स्वतंत्र झाला आहे. 1857 नंतर, भारतीयांचा असंतोष योग्य प्रकारे व्यक्त व्हावा आणि त्यामुळे नुकसान होऊ नये, यासाठी काही व्यवस्था केली जात होती, परंतु काही लोकांनी तिचा ताबा घेतला आणि तिला स्वातंत्र्यलढ्याचे शस्त्र बनवले.
ते म्हणाले की, ‘इंडियन नॅशनल काँग्रेस' या नावाने ती धारा सुरू झाली. त्यातूनच अनेक राजकीय प्रवाह बाहेर पडले. इतके सारे राजकीय पक्ष निघाले. त्या राजकीय आंदोलनाने देशाला चरखा चालवायला आणि जगणे-मरणे शिकवले. स्वातंत्र्यानंतर त्या प्रवाहाला जसे असायला हवे होते, तसे झाले असते तर आजचे चित्र वेगळे असते. पण तसे झाले नाही. दोष देण्यासारखे नाही, हे एक सत्य आहे.
देशात एक तिसरी धारा होती, ज्यांनी समाजाला त्यांच्या मूळ मूल्यांवर चालण्याचे आवाहन केले. स्वामी दयानंद सरस्वती आणि स्वामी विवेकानंद ही त्या धारेतील प्रमुख नावे होती. संघ संपूर्ण भारतात सर्वांना संघटित करण्याचे काम करत आहे. संघाचे काही कट्टर विरोधक होते, तेही आज समर्थक बनले आहेत.'