भाजपचा पुढील अध्यक्ष महिला किंवा ओबीसी असतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. RSS आणि भाजपच्या बैठकीत यासंबंधात चर्चा झाल्याची माहिती आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी पाच तास बैठक झाली. यावेळी भाजपचा पुढील अध्यक्ष कोण होणार याबाबत चर्चा झाली. काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार असल्याची चर्चा होती. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांकडे सोपवल्यानंतर आता राष्ट्रीय अध्यक्षपदाची चाचपणी केली जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा, राजनाथ सिंग, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आरएसएस सदस्य दत्तात्रय होसबले आणि सह सरचिटणीस अरुण कुमार बैठकीत उपस्थित होते.
आतापर्यंत भाजपच्या अध्यक्षपदावर एकदाही महिलेची नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे जर भाजपने राष्ट्रीय अध्यक्षपदी महिलेची नियुक्ती केली तर हे मोठं पाऊल मानलं जाऊ शकतं. या निवडीचा परिणाम आगामी निवडणुकीत जनतेवर होऊ शकतो.
नक्की वाचा - देवेंद्र फडणवीसच BIGG BOSS! भाजपच्या बैठकीत विधानसभेसाठी काय रणनीती ठरली?
नवी दिल्लीत भाजप आणि संघाच्या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. काय होते या बैठकीतील मुद्दे...
- भाजपच्या पुढील अध्यक्षांवर चर्चा झाली
- भाजपचा पुढील अध्यक्ष महिला किंवा ओबीसी असू शकतो, अशीही चर्चा झाली.
- 2029 मधील लोकसभा निवडणुकीपूर्वी संसद आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिला कोट्याची अंमलबजावणी होणार आहे. भाजपकडे यापूर्वी कधीही महिला अध्यक्ष नव्हते. त्यामुळे महिला अध्यक्षांचा विचार केला जाऊ शकतो.
- बांगलादेशमधील अल्पसंख्याक हिंदूंच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करण्यात आला.
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी चर्चा करूनच पुढचा अध्यक्ष निवडला जाईल, हे स्पष्ट झाले आहे.
- संघटनेला सांभाळण्यासाठी सक्षम व्यक्ती असायला हवी, संघाचे मत
- बांगलादेश हिंदूंच्या सुरक्षेचा विचार करून सरकारने भारत-बांगलादेश सीमेवरच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे,
- ईशान्य भारतातील अनेक राज्यांनी आपल्या राज्यांमध्ये निर्वासितांना आश्रय न देण्याची भूमिका घेतली आहे.
- बांगलादेश सरकारने आपल्या देशात अल्पसंख्याक हिंदूंचे रक्षण केले पाहिजे, कारण ते बांगलादेशी आहेत.