“सागरा प्राण तळमळला…” या सावरकरांच्या अमर काव्याला 116 वर्षे पूर्ण; अंदमान–निकोबारमध्ये भव्य कार्यक्रम

सावरकर यांनी रचलेल्या, ‘सागरा प्राण तळमळला’ या अजरामर काव्याला 116 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 12 डिसेंबर 2025 रोजी श्री विजया पुरम, अंदमान-निकोबार येथे हा सोहळा पार पडणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक तेजस्वी पर्व असलेल्या स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी एक भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सावरकर यांनी रचलेल्या, ‘सागरा प्राण तळमळला' या अजरामर काव्याला 116 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 12 डिसेंबर 2025 रोजी श्री विजया पुरम, अंदमान-निकोबार येथे हा सोहळा पार पडणार आहे.

ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार

या कार्यक्रमाची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या सोहळ्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोघेही प्रथमच अंदमानमध्ये एकत्रित उपस्थित राहणार आहेत. हा क्षण राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या कार्यक्रमात डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याचे अनावरण केले जाईल आणि यावेळी अमित शहा हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील.

पुतळ्याची निर्मिती आणि संकल्पना

सावरकरांच्या या पुतळ्याची संकल्पना व्हॅल्युएबल ग्रुपचे संचालक अमेय हेटे यांनी मांडली आहे, तर या पुतळ्याची निर्मिती महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित आणि प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांनी केली आहे. राम सुतार यांनी यापूर्वी अनेक महत्त्वाच्या राष्ट्रीय स्मारकांची निर्मिती केली आहे.

मंगेशकर कुटुंबाचे विशेष सादरीकरण

या सोहळ्याला मंगेशकर कुटुंबाची मानाची उपस्थिती लाभणार आहे. पद्मश्री पं. हृदयनाथ मंगेशकर आणि उषा मंगेशकर या कार्यक्रमात देशभक्तिपूर्ण गीतांचे विशेष सादरीकरण करणार आहेत.

Advertisement

इतर प्रमुख अतिथी

  • महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री अॅड. आशिष शेलार
  • प्रसिद्ध अभिनेते रणदीप हुडा आणि शरद पोंक्षे
  • इतिहासकार डॉ. विक्रम संपत

कार्यक्रमात ‘ने मजसी ने...', ‘जयोस्तुते', ‘जय जय शिवराया' आणि सावरकरांनी रचलेल्या इतर भावस्पर्शी गीतांचे विशेष सादरीकरण होणार आहे. संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन मेराक इव्हेंट्सच्या वतीने मंजिरी हेटे आणि प्रसाद महाडकर यांनी केले आहे. हा भव्य सोहळा सावरकरांच्या विचारांना आणि त्यागाला आदरांजली देणारा ठरणार आहे.

Topics mentioned in this article