शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतली भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

माजी कृषी मंत्री आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांनी आज 18 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली.

जाहिरात
Read Time: 3 mins
नवी दिल्ली:

रामराजे शिंदे, प्रतिनिधी

माजी कृषी मंत्री आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांनी आज 18 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. काल 17 डिसेंबर रोजी उद्धव ठाकरे यांनी नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. त्यानंतरही या भेटीची मोठी चर्चा झाली होती.

आज 18 डिसेंबरला शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीचे अनेक तर्कवितर्क काढले जात आहे. या भेटीदरम्यान शरद पवार साताऱ्यातील दोन शेतकऱ्यांना सोबत घेऊन गेले होते. या शेतकऱ्यांनी मोदींना त्यांच्या शेतातील डाळिंब भेट म्हणून दिली. राज्यसभा खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवारांनी शेतकऱ्यांच्या समुहासह पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. 

नुकतच शरद पवारांनी पंतप्रधान मोदींना 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी  निमंत्रण दिलं आहे. त्यानंतर आज शरद पवारांनी थेट मोदींची भेट घेतली. संसदेत अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा देशभरातून निषेध व्यक्त केला जात आहे.  आज सायंकाळी अमित शाह पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार असल्याची माहिती आहे.  

नेमकं काय घडलं? काय आहेत भेटीमागील गणितं?

17 डिसेंबरला शरद पवार अचानकपणे तालकटोरा मैदानात गेले आणि पाहणी केली. दिल्लीतील तालकटोरा स्टेडिअम इथं २१ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारीला अखिल भारतीय मराठी साहित्य संम्मेलन पार पडत आहे. त्यापूर्वी तयारीचा आढावा घेण्यासाठी पवार तिथे गेले होते. शरद पवार मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. या साहित्य संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रण करण्यासाठी शरद पवार यांनी मोदी यांची भेट घेतली होती. 

Advertisement

या भेटीदरम्यान शरद पवार यांच्यासोबत दोन शेतकरी होते. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात त्यांची डाळींबाची बाग आहे. तेथून आणलेले भगवे डाळींब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले. आता या भगव्या डाळिबांची राजधानी दिल्लीत चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. भगवं डाळींब देण्यामागे शरद पवारांचा काय उद्देश अशा सुरस कथा सुरू झाल्या. यातून काय संकेत दिले जाताहेत. शरद पवार पण भगव्या रंगाकडे आकर्षित झाले आहेत? शिवाय शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही जवळकी भविष्यात राजकीय जवळीक ठरणार का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. 

कारण गेल्या आठवड्यात शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि मोदी यांची झालेली बैठक खूप काही सांगून जात आहे. दरम्यान यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांची वेगळी बैठक झाली. या बैठकीत मराठी साहित्य संम्मेलनासह राजकीय बाबींवर चर्चा झाल्याची माहिती आहे. पण खरंच मराठी साहित्य संमेलनाचा मुद्दा आहे की भगव्या डाळिंबाआड आणखी पुढची राजकीय गणितं आखली जात आहे हे लवकरच कळेल.

Advertisement