Sharia Based Gym : जिममध्ये वर्कआऊट करायचं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? जोरात चालणारं म्युझिक, ट्रॅकसूटमधील तरुण-तरुणी आणि व्यायामाचा उत्साह. पण सध्या एका जिमनं घेतलेल्या निर्णयामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ही चर्चा साधीसुधी नसून एका नव्या नियमावलीमुळे निर्माण झाली आहे. एका बाजूला व्यायामाची आवड आणि दुसरीकडे धार्मिक नियमांची जोड, असा काहीसा प्रकार केरळमध्ये पाहायला मिळतोय.
शरीयतनुसार चालणारं पहिलं जिम
केरळमधील पालक्काड जिल्ह्यातील पुथूनगरम भागात हे प्रकरण समोर आलं आहे. गेल्या 15 वर्षांपासून सुरू असलेल्या एका फिटनेस सेंटरनं आता 'इस्लाम फ्रेंडली जिम' बनण्याची घोषणा केली आहे.
शरीयतच्या नियमांनुसार हे जिम चालवलं जाईल, असं व्यवस्थापनानं म्हटलं आहे. केरळमधील अशा प्रकारचं हे पहिलं आणि वेगळं जिम असल्याचा दावा केला जात असून, यामुळे आता सार्वजनिक स्तरावर वादाला तोंड फुटलं आहे.
( नक्की वाचा : Pune News: पुण्यातील बड्या आयटी कंपनीत 'कॉर्पोरेट जिहाद'? लग्नासाठी आणि धर्मांतरासाठी महिला कर्मचाऱ्याचा छळ )
म्युझिकवर बंदी आणि ड्रेस कोडचे कडक नियम
या जिममध्ये काही विशेष बदल करण्यात आले आहेत, जे कोणत्याही सामान्य जिमपेक्षा वेगळे आहेत. सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे जिममध्ये म्युझिक किंवा गाणी वाजवण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय, कपड्यांबाबतही कडक नियम लागू करण्यात आले आहेत.
सदस्यांना त्यांचे शरीर पूर्णपणे झाकले जाईल अशाच कपड्यांमध्ये व्यायाम करावा लागेल. विशेषतः महिलांना हिजाबसह संपूर्ण शरीर झाकलेले कपडे घालणे बंधनकारक असेल. इस्लाममधील 'अवराह' म्हणजे शरीराचे जे भाग झाकलेले असणे आवश्यक आहे, त्या नियमाचे पालन करणे येथे अनिवार्य करण्यात आले आहे.

स्त्री-पुरुषांसाठी वेगळी वेळ आणि कडक वेळापत्रक
या जिममध्ये आता स्त्री आणि पुरुषांना एकत्र वर्कआऊट करता येणार नाही. व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे की, दोन्ही गटांसाठी व्यायामाच्या वेळा पूर्णपणे वेगळ्या असतील. धार्मिक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यासाठीच हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
'नवाज मुथू टी' नावाच्या इंस्टाग्राम प्रोफाईलवरून या बदलांची माहिती देणारा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. मात्र, वाद वाढल्यानंतर तो व्हिडिओ डिलीट करण्यात आला आहे.
सोशल मीडियावर वादाचा धुरळा
या निर्णयामुळे सोशल मीडियावर दोन गट पडले आहेत. काही लोक याला वैयक्तिक धार्मिक निवडीनुसार मिळालेली जागा म्हणत समर्थन करत आहेत. तर दुसरीकडे, सार्वजनिक जीवनात अशा प्रकारच्या वेगळ्या सुविधा आणि धार्मिक अटींवर काही लोकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. ही संस्था केवळ फिटनेसपुरती मर्यादित राहील की इतर काही प्रशिक्षण दिले जाईल, अशी शंकाही काही स्तरातून व्यक्त केली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world