उत्तरप्रदेश: लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस. लग्न म्हणजे दोन जिवांचा संगम अन् नव्या आयुष्याची सुरुवात. मात्र उत्तरप्रदेशमध्ये लग्नसोहळ्यातच एक काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. लग्नसोहळा आटोपून नवरी सासरी निघत असतानाच नवरदेवाला चक्कर आल्याने तो खाली कोसळला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले मात्र वाटेतच त्याचा दुर्दैवी अंत झाला. या मन सुन्न करणाऱ्या घटनेने लग्नघरात शोककळा पसरली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यात लग्नसोहळ्याचा आनंद सुरु असतानाच एक हृदयद्रावक घटना घडली. थाटामाटात लग्नसोहळा पार पडल्यानंतर घरी जाण्यासाठी नववधू गाडीत बसत होती. याचवेळी अचानक नवरदेव बेशुद्ध झाला आणि रुग्णालयामध्ये नेण्याआधीच त्याचा अंत झाला. या प्रकराने लग्नघरात एकच गोंधळ उडाला.
मिळालेल्या माहितीनुसार, आंग पोलीस स्टेशन परिसरातील एका ग्रामस्थाने आपल्या मुलीचे लग्न कानपूर शहरातील नौबस्ता येथील रहिवासी श्याम सुंदर यांचा मुलगा मोनू गौतम याच्याशी ठरवले होते. गेल्या रविवारी रात्री लग्नाची मिरवणूक गावात पोहोचली. रात्री उशिरापर्यंत लग्नाच्या जवळजवळ सर्व विधी पूर्ण झाल्याचे सांगण्यात येत आहे.
(नक्की वाचा- Bhushan Gavai : न्यायमूर्ती भूषण गवई 52 वे सरन्यायाधीश, घेतली पदाची शपथ)
सोमवारी सकाळी शेवटी लग्न समारंभाच्या अल्पोहाराची तयारी सुरू होती, वधूही येऊन गाडीत बसली होती. अशातच नवरदेव मोनू बेशुद्ध पडला. ताबडतोब स्थानिक खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्याची गंभीर प्रकृती पाहून डॉक्टरांनी त्याला कानपूरला रेफर केले. कुटुंब त्याला उपचारासाठी कानपूरला घेऊन जात होते, तेव्हा वाटेत वराच्या मोनूचा श्वास थांबला. हे पाहून कुटुंबातील सदस्यांमध्ये गोंधळ उडाला. सध्या या दुःखद घटनेनंतर वधूला निरोप देण्यात आलेला नाही.