बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूर हिच्याबाबत एक मोठी राजकीय चर्चा सुरू झाली आहे. मैथिली ठाकूर 2025 ची विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत झालेल्या भेटीनंतर या चर्चांना अधिक उधाण आले आहे. या भेटीदरम्यान मैथिलीचे वडील देखील उपस्थित होते.
"मी नुकतीच बिहारला गेले होते आणि मला नित्यानंद राय आणि विनोद तावडे यांना भेटण्याची संधी मिळाली. आम्ही बिहारच्या भविष्यावर चर्चा केली," असे तिने सांगितले. निवडणूक लढण्याविषयी विचारले असता, तिने म्हटलं की, "अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. पुढे काय होते, ते पाहूया. मला माझ्या गावाच्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास आवडेल, कारण माझे त्या जागेवर खूप प्रेम आहे."
(नक्की वाचा- Bihar Election Date: बिहारमध्ये 2 टप्प्यात मतदान, 14 नोव्हेंबरला मतमोजणी, 'या' तारखेला मतदान)
बिहार निवडणुकीत मैथिली कोणाला समर्थन देत आहे, या प्रश्नावर तिने कोणतीही टिप्पणी करण्यास नकार दिला. मात्र, "देशाच्या विकासात शक्य तेवढे योगदान देण्यासाठी मी पूर्ण ताकदीने उभी राहीन," असे त्यांनी स्पष्ट केले.
विनोद तावडे यांनी केले होते आवाहन
भाजपचे नेते विनोद तावडे यांनी या भेटीनंतर रविवार 'X' हँडलवरून फोटो शेअर करत खास आवाहन केले होते. विनोत तावडे यांनी म्हटलं की, " 1995 मध्ये बिहारमध्ये लालू राज आल्यावर जे कुटुंब बिहार सोडून गेले होते, त्या कुटुंबाची कन्या आणि सुप्रसिद्ध गायिका मैथिली ठाकूर जी आता बदलत्या बिहारची गती पाहून पुन्हा बिहारमध्ये येऊ इच्छित आहे. गृह राज्यमंत्री नित्यानंद राय जी आणि मी त्यांना आवाहन केले की, बिहारच्या जनतेसाठी आणि विकासासाठी मैथिली ठाकूर यांचे योगदान बिहारमधील सामान्य माणसाला अपेक्षित आहे आणि त्यांनी त्यांच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात. बिहारची कन्या मैथिली ठाकूर जी यांना अनंत शुभेच्छा!"
(नक्की वाचा- Ratnagiri Politics: रत्नागिरी जिल्ह्यात महिलाराज! नेत्यांची डोकेदुखी वाढली; कोणत्या प्रवर्गाला आरक्षण?)
भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी केलेले हे आवाहन आणि मैथिली ठाकूरने गावातील मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची दर्शवलेली तयारी यामुळे त्या लवकरच सक्रिय राजकारणात प्रवेश करू शकते, असे संकेत मिळत आहेत.