अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो ( Nicolas Maduro Captured) यांना त्यांच्या घरातून अटक करवली. मादुरो आणि त्यांची पत्नी झोपलेले असताना त्यांच्या बेडरुममध्ये घुसून अमेरिकेच्या सैनिकांनी त्यांना अटक केली. भारतानेही आता फार काळ वाट न पाहाता अमेरिकेप्रमाणेच निर्णय घ्यावा आणि पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल आसिम मुनीर आणि त्यांच्या पत्नीला अटक करावी अशी मागणी जम्मू काश्मीरच्या माजी पोलीस महासंचालकांनी केली आहे. पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल आसिम मुनीर आणि त्यांच्या पत्नीला अटक करण्यासाठी ‘ऑपरेशन सिंदूर 2' राबवावे, अशी मागणी त्यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टद्वारे केली आहे. या पोस्टमध्ये जम्मू-काश्मीरचे माजी पोलीस महासंचालक (DGP) एस. पी. वैद यांनी भारतानेही आता आपली रणनीती बदलण्याची वेळ आली असल्याचे म्हटले आहे.
नक्की वाचा: मुलीनं देशाची शान उंचावली, अख्ख्या गाव स्वागतासाठी पोहोचलंच दृश्य पाहून मजूरकाम करणाऱ्या बापाचे डोळे पाणावले
वैद यांनी आपल्या पोस्टमध्ये काय म्हटले आहे?
जम्मू-काश्मीरचे माजी पोलीस महासंचालक (DGP) एस. पी. वैद यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ट्रम्प यांनी व्हेनेझुएलामध्ये जे केले, ते पारंपारिक युद्ध नव्हते. अमेरिकन स्पेशल फोर्सेसने थेट राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानात घुसून त्यांना ताब्यात घेतले आणि अमेरिकेत आणले. जर अमेरिका युद्ध पुकारल्याशिवाय एखाद्या देशाच्या प्रमुखाला त्यांच्या गुन्ह्यांसाठी अटक करू शकते, तर भारताला पाकिस्तानातील दहशतवादाचे मुख्य सूत्रधार आसिम मुनीर यांच्यावर कारवाई करण्यापासून कोणी रोखू नये. ट्रम्प यांनी आखून दिलेली ही नवीन ओळ भारतासाठी एक मोठी संधी असल्याचे वैद यांचे म्हणणे आहे
वैद यांनी का केली आसिम मुनीर यांच्या अटकेची मागणी?
- बलोचिस्तान: बलोचिस्तानमध्ये स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्या नागरिकांवर आणि विद्यार्थ्यांवर पाकिस्तानी लष्कर अमानुष अत्याचार करत आहे. मुनीर यांना पदावरून हटवणे ही बलोच जनतेसाठी मोठी सुटका ठरेल.
- पीओके (PoK): पाकव्याप्त काश्मीरमध्ये महागाई आणि मूलभूत सुविधांच्या अभावामुळे होणारी आंदोलने मुनीर यांचे लष्कर दडपून टाकत आहे.
- खैबर पख्तूनख्वा: या भागात पश्तून समुदायाविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमांमुळे गृहयुद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
मुनीर यांच्यावर खटला चालला पाहीजे, वैद यांची मागणी
जनरल मुनीर हे केवळ भारतामध्ये घडवून आणल्या जात असलेल्या दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देत नसून ते पाकिस्तानमध्येही उचापती करत आहेत असे वैद यांचे म्हणणे आहे. पाकिस्तानच्या जनतेच्या दृष्टीनेही मुनीर हे एकप्रकारे गुन्हेगार असून त्यांच्यावर खटला चालवणे गरजेचे असल्याचे वैद यांचे म्हणणे आहे. मे 2025 मध्ये झालेल्या 'ऑपरेशन सिंदूर'च्या कारवाईने पाकिस्तानला आधीच धक्का दिला होता. आता त्याच्या दुसऱ्या टप्प्यात थेट लष्करप्रमुखांना लक्ष्य केल्यास रावळपिंडीतील लष्करी सत्तेला मोठा हादरा बसेल. जरी पाकिस्तान हा आण्विक शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेला देश असला, तरी सार्वभौमत्वाचा बहाणा गुन्हेगारांना वाचवू शकत नाही, हे अमेरिकेने सिद्ध केले आहे, त्यामुळे भारतानेही तसेच करावे असे वैद यांचे म्हणणे आहे.
नक्की वाचा: रेल्वेच्या डब्ब्यांना निळा, लाल अन् हिरवा रंगच का असतो? जाणून घ्या त्यामागचे खास 'सिक्रेट'