Success Story Kirti Kalam BSF : डोक्यावर बीएसएफची कॅप,कपाळावर अशोक स्तंभ,पायात फौजी बूट आणि चेहऱ्यावर आत्मविश्वासाने भरलेले हास्य. हे दृश्य होते मध्य प्रदेशातील हरदा जिल्ह्यातील टिमरनी रेल्वे स्टेशनचे..मजुराची मुलगी किर्ती कलम बीसीएफची जवान झाल्यानंतर गावातील सर्व लोकांचं उर अभिमानाने भरलं. गावकऱ्यांनी रेल्वे स्टेशनवर या मुलीचं असं स्वागत केलं की, प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आले.
बीएसएफची ट्रेनिंग पूर्ण केली अन् घरी परतली
कीर्ती कलम मध्य प्रदेशच्या हरदा जिल्ह्यातील टिमरनी तालुक्यातील बारजा गावची रहिवासी आहे. बीएसएफची ट्रेनिंग पूर्ण करून कीर्ती पहिल्यांदाच आर्मी ड्रेसकोडमध्ये घरी पोहोचत आहे,याबाबत गावकऱ्यांना जेव्हा कळलं, तेव्हा अख्ख गाव 5 किमी दूर असलेल्या टिमरनी रेल्वे स्टेशनवर पोहोचलं. ग्रामस्थांनी पुष्पगुच्छ आणि जयघोष करत मुलीचं ऐतिहासिक स्वागत केलं.
NDTV शी बोलताना किर्तीने काय म्हटलं?
एनडीटीव्हीशी संवाद साधताना किर्ती कलम म्हणाल्या,रेल्वे स्टेशनवर मिळालेलं प्रेम आणि सन्मान पाहून तिच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.तुमच्याकडे मोठी जिद्द असेल, तर गरिबी स्वप्नांच्या आड कधीच येत नाही, असंही तिने म्हटलं. किर्ती कलम यांची ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर त्यांना मेघालय येथे पोस्टिंग मिळाली आणि त्या बुधवारी रवाना झाल्या.
वडिलांचे डोळेही पाणावले
गावकऱ्यांनी स्टेशनपासून गावापर्यंत किर्तीचं जंगी स्वागत केलं. तिच्यावर फुलांचा वर्षावही केला.लोकांचं आपल्या मुलीसाठीचं आदर आणि प्रेम पाहून तिचे वडील भंवरसिंह कलम यांच्या डोळ्यातही अश्रू आले. त्यांनी म्हटलं की, संपूर्ण गावाने मुलीच्या यशाचा जल्लोष केला.हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा अभिमानास्पद क्षण आहे.

मध्य प्रदेश पोलीस आणि बीएसएफमध्ये एकाच वेळी निवड
किर्तीचे वडील भवरसिंह कलम यांनी म्हटलं की,ते भाजपचे वरिष्ठ नेते उपेंद्र गद्रे यांच्या फार्महाऊसवर मजुरी करतात. स्वतः शिक्षण घेऊ शकले नाहीत,पण मुलीच्या शिक्षणाच्या वाटेत कधीच अडथळा आणला नाही.कीर्तीची निवड मध्य प्रदेश पोलीस आणि सीमा सुरक्षा दलात एकाच वेळी झाली होती.पण तिने देशाचे रक्षण करण्याच्या उद्देशाने बीएसएफमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.
ग्रामीण मुलींसाठी आदर्श
मध्य प्रदेशातील छोट्याशा बारजा गावातून देशाच्या सीमांपर्यंत पोहोचलेली कीर्ती कलम आज संपूर्ण हरदा जिल्ह्यातील मुलींसाठी प्रेरणादायी ठरली आहे.मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कोणत्याही परिस्थितीत उंच भरारी घेता येते, असाच संदेश किर्तीनं अनेकांना दिला आहे. बीएसएफची ट्रेनिंग पूर्ण करून गावात परतल्यावर कीर्ती कलमचे रेल्वे स्टेशनवर भव्य स्वागत करण्यात आले या सोहळ्यात भाजप मंडळ अध्यक्ष अतुल बारंगे, उपेंद्र गद्रे,गौरव गद्रे यांच्यासह मोठ्या संख्येने नगरवासी,ग्रामीण,जनप्रतिनिधी आणि नातेवाईक उपस्थित होते.माजी आमदार संजय शाह यांनीही बारजा येथे पोहोचून कीर्तीचे स्वागत आणि सन्मान केला.सर्वांनी देशसेवेसाठी तिला शुभेच्छा दिल्या.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world