पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या ज्योती मल्होत्रा आणि पाकिस्तानी गुप्तचर संस्थेचा अधिकारी अली हसन यांच्यातील व्हॉट्सॲप चॅट समोर आले आहे. या चॅटमध्ये अली हसन ज्योतीला म्हणतो, मी तुझ्यासाठी मनापासून दुवा करतो. तू नेहमी आनंदी राहा. तू नेहमी हसत-खेळत राहा. आयुष्यात कधीही कोणतेही दुःख तुला येऊ नये." अशा शब्दात त्याने ज्योती बाबत आपल्या मनातील गोष्टी व्यक्त केली आहे. ऐवढेच नाही तर त्याला ज्योतीने दिलेला रिप्लाय ही तितकाच बोलका आहे. तिच्या चौकशीत आता हे चॅटही उघड झालं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
यावर ज्योती मल्होत्राने अली हसनला हसणाऱ्या इमोजीसह उत्तर दिले आहे. ती त्याला म्हणते असं असेल तर माझं लग्न पाकिस्तानात लावून द्या. या चॅटमधून हे स्पष्ट होते की ज्योतीचे पाकिस्तानसोबत भावनिक संबंध होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योती पाकिस्तानी गुप्तचर संस्थेचा अधिकारी अली हसनच्या सतत संपर्कात होती. त्याच्याशी ती नेहमीच बोलत असे. फोन असेल किंवा मेसेज असतील त्या माध्यमातून ती त्याच्या सतत संपर्कात होती. तिच्या चॅटवरून तर ती पाकिस्तानच्या प्रेमात पडली होती असं दिसून येत आहे.
पोलिसांच्या सूत्रांनुसार, तपासादरम्यान पोलिसांना ज्योतीच्या चार बँक खात्यांची माहिती मिळाली आहे. एका बँक खात्यामध्ये दुबईतून व्यवहार झाल्याचेही समोर आले आहे. तपास यंत्रणा आता ज्योतीच्या सर्व बँक खात्यांची चौकशी करत आहे. तिच्या खात्यात पैसे कुठून येत होते, याचा शोध घेत आहे. तिच्या खात्यात किती पैसे आहेत याचा तपशील मात्र पुढे येवू शकलेला नाही. ज्योतीने पैशासाठी पाकिस्तानची हेर बनवल्याचा तिच्यावर आरोप आहेत. त्यामुळेच तिला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी ज्योतीला १७ मे रोजी हरियाणातील हिसार येथून अटक केली होती. ज्योती हिसारची रहिवासी असून ती यूट्यूब ब्लॉगर आहे. ती वेगवेगळ्या देशात या निमित्ताने फिरायला जाते. त्या देशाची माहिती देणारे व्हिडीओ ती आपल्या युट्यूब चॅनेलवर अपलोड करत असते. पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली तिला अटक करण्यात आली होती. न्यायालयात हजर केल्यानंतर तिला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. सध्या वेगवेगळ्या संस्था मार्फत तिची चौकशी करण्यात येत आहे.