
अनुराधा पासवान ही 'लुटेरी दुल्हन' म्हणून प्रसिद्ध आहे. तिने जवळपास 25 तरुणांची खोटं लग्न करून फसवणूक केली आहे. ऐढच नाही तर ती त्यांच्याकडून लाखो रुपये आणि दागिने घेवून पळून जात होती. पुरुषांना बनावट लग्नाच्या जाळ्यात ओढण्यासाठी ती नवीन नाव, नवीन ओळख आणि नवीन शहर निवडत होती. लग्न केल्यानंतर ती दागिने आणि रोकड घेऊन पळून जायची. त्या आधी ती आपण एक आदर्श बायको आणि सून असल्याची बतावणी करायची त्यामुळे तिच्यावर सर्वांचाच विश्वास बसायचा. शेवटी तिचीच आयडियी पोलिसांनी तिच्यावर वापरली आणि तिला गजाआड केली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
32 वर्षीय ही लुटेरी दुल्हन उत्तर प्रदेश, भोपाळ आणि राजस्थानमध्ये आपल्या टोळीद्वारे विवाहयोग्य पुरुषांना लक्ष्य करत असे. मोबाईलवर आपले फोटो पाठवत असे आणि स्वतःला एकटी, गरीब आणि असहाय्य सांगून सहानुभूती मिळवत असे. माझे वडील नाहीत आणि भाऊ बेरोजगार आहे असेही ती सांगत असे. तिला लग्न करायचे आहे, परंतु घरची आर्थिक परिस्थिती खराब आहे, असे ती भासवत असे. लोक तिच्या साध्यासुध्या चेहऱ्याला आणि बोलण्याला भुलत असत. पण ती एका बनावट विवाह टोळीची सूत्रधार होती. ही टोळी तरुणांना लग्नाच्या नावाखाली गंडा घालत होती. तिच्या टोळीतील सदस्य तिचे फोटो आणि प्रोफाइल लग्नासाठी इच्छुक असलेल्या तरुणांकडे पाठवत असत. आदर्श जीवनसाथी शोधणारे लोक त्यांचे लक्ष्य असत. ही टोळी मुलगा-मुलीचे लग्न लावून देण्यासाठी 2 लाख रुपये वेगळे घेत असत.
एकदा व्यवहार निश्चित झाल्यावर विवाह संमती पत्र तयार केले जात असे. जोडपे मंदिरात किंवा घरी रीतीरिवाजांनुसार लग्न करत असत. यानंतर खरा खेळ सुरू होत होता. अनुराधा पासवान नवरदेव आणि आपल्या सासरच्या लोकांशी खूप गोड बोलत असे. त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी कुटुंबातील प्रत्येक सदस्याशी एक विशेष संबंध निर्माण करत असे. यानंतर ती आपल्या योजनेतील शेवटचे काम करत असे. ते म्हणजे ती जेवणात गुंगीचे औषध मिसळून सर्वांना बेशुद्ध करते. त्यानंतर घरातले दागिने, रोकड आणि मौल्यवान वस्तू घेऊन पसार होत असे.
20 एप्रिल रोजी सवाई माधोपूर येथील रहिवासी विष्णू शर्मानेही याच अनुराधाशी लग्न केले. लग्न हिंदू रीतीरिवाजांनुसार मित्र आणि कुटुंबाच्या उपस्थितीत झाले. लग्न दलाल पप्पू मीनाद्वारे निश्चित झाले होते. त्यासाठी विष्णूने त्याला दोन लाख रुपये दिले होते. लग्नाच्या दोन आठवड्यांच्या आतच अनुराधा 1.25 लाख रुपयांचे दागिने, 30 हजार रुपये रोख आणि 30 हजार रुपयांचा मोबाईल घेऊन पसार झाली होती. विष्णूने सांगितले की, "मी ठेला चालवतो, कर्ज घेऊन लग्न केले होते. मी मोबाईलही उधार घेतला होता. तोही तिने चोरला. मला कधीच वाटले नव्हते की ती मला फसवेल." विष्णू सांगतो की त्या रात्री "मी माझ्या कामावरून उशिरा परतलो. जेवण करून लगेच झोपलो होतो. मी सहसा जास्त झोपत नाही, पण त्या रात्री मी एका लहान मुलासारखा झोपलो, जसे कोणीतरी मला झोपेची गोळी दिली असेल."
विष्णूची आईही याघटनेनंतर हादरून गेली आहे. यानंतर शर्मा कुटुंबाने पोलिसात तक्रार दाखल केली. विष्णूची आई तारा देवीला अजूनही विश्वास बसत नाही की सून बनून आलेली महिला त्यांचे सर्व काही लुटून निघून गेली . तारा देवी म्हणाली की, "ती खूप आनंदी होती, सगळ्यांशी चांगले वागत होती. आम्ही विचार केला होता की देवाने चांगली सून दिली, माहित नव्हते की ती धोकेबाज निघेल." असं त्यानंतर सांगतात.
विष्णूने दिलेल्या माहितीच्या आधारावर सवाई माधोपूर पोलिसांनी अनुराधासाठी सापळा रचला. एका कॉन्स्टेबलला तिच्याशी लग्न करण्याच्या बहाण्याने पाठवण्यात आले. तोच एजंटसाठी ग्राहकही होता. एजंटने अनेक महिलांचे फोटो दाखवले. त्यात अनुराधाचा ही फोटो होता. त्याने हिच्या बरोबर लग्न करायचे आहे असे सांगितले. पूर्ण तपासानंतर अनुराधाला भोपाळमधून अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या संपूर्ण टोळीचा पर्दाफाश झाला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world