रस्त्यांवर फिरणाऱ्या मोकाट कुत्र्यांची आता खैर नाही. भटके कुत्रे अनेक वेळा लोकांवर हल्ला करतात. त्यांचा चावा घेतात. अशा घटना वाढल्या आहेत. कुत्र्यांना पायबंद घालण्याच्या अनेक उपाययोजना आखल्या गेल्या. पण आता या कुत्र्यांना आवरण्यासाठी रामबाण उपाय शोधून काढण्यात आला आहे. मोकाट कुत्र्यांनी जर आता एखाद्यावर हल्ला करत, दोनदा चावा घेतला तर त्याला थेट जन्मठेपेची शिक्षा सुनावली जाईल. तसे तर ही शिक्षा एखाद्या मोठ्या गुन्ह्यासाठी माणसाला दिली जाते, पण आता यूपीच्या रस्त्यांवर फिरणाऱ्या मोकाट कुत्र्यांनाही ही शिक्षा दिली जाईल. उत्तर प्रदेशातील भाजप सरकार हा आदेश जारी केला आहे.
ऐकायला हे थोडे विचित्र वाटत असेल. पण कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळे लोकांना होत असलेल्या त्रासाला पाहून मुख्य सचिव नगर विकास अमृत अभिजात यांनी राज्याच्या सर्व नगर संस्थांना नवा आदेश जारी केला आहे. यात हल्लेखोर कुत्र्यांना शिक्षेची तरतूद केली आहे. आदेशानुसार, पहिल्यांदा कोणाला चावल्यास कुत्र्याला आधी दहा दिवसांची शिक्षा होईल. दुसऱ्यांदा चावल्यास त्याला आयुष्यभर 'अॅनिमल बर्थ कंट्रोल' सेंटरमध्ये ठेवले जाईल.
प्रयागराज नगर निगमचे पशु चिकित्सा आणि कल्याण अधिकारी डॉ. बिजय अमृतराज यांच्या मते, नगर विकास विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार, जर एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदा कुत्रा चावतो, तर कुत्र्याला दहा दिवसांची शिक्षा होईल. या काळात कुत्र्याला 'अॅनिमल बर्थ कंट्रोल' म्हणजेच ABC सेंटरमध्ये ठेवले जाईल, पण जर तोच कुत्रा दुसऱ्यांदा कोणाला चावतो, तर तीन सदस्यांची एक टीम या प्रकरणाची चौकशी करेल. कुत्र्याला पुन्हा ABC सेंटरमध्ये आयुष्यभर ठेवले जाईल.
जन्मठेपेची शिक्षा मिळालेल्या कुत्र्याला तेव्हाच सोडले जाईल, जेव्हा एखादी व्यक्ती अधिकृतपणे त्याला दत्तक घेईल. तथापि, हल्लेखोर आणि हिंसक झालेल्या कुत्र्यांना शिक्षा देण्यासाठी जारी केलेल्या आदेशात काही अटीही ठेवण्यात आल्या आहेत. यासाठी पीडित व्यक्तीला सरकारी रुग्णालयात उपचाराचे प्रमाणपत्र द्यावे लागेल. ABC सेंटरवर उपचारासोबत कुत्र्यावर देखरेख ठेवली जाईल. दहा दिवसांनंतर ABC सेंटरमधून सोडण्यापूर्वी कुत्र्याच्या शरीरावर एक मायक्रोचिप लावली जाईल. या मायक्रोचिपच्या माध्यमातूनच कुत्र्याच्या वर्तनावर लक्ष ठेवले जाईल. यूपी सरकारचा आदेश मिळताच त्यावर अंमलबजावणीही सुरू करण्यात आली आहे. एक गोष्ट निश्चित आहे की या आदेशानंतर राज्यातील जनतेला थोडा दिलासा नक्कीच मिळेल. प्रयागराजच्या करेली परिसरात दोन वर्षांपूर्वीच 'अॅनिमल बर्थ कंट्रोल' सेंटरची स्थापना करण्यात आली आहे.