Stray Dogs Saved Newborn Baby : भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याचे वृत्त तुम्ही नेहमी वाचत असाल. मात्र बंगालमधून असं वृत्त समोर आलंय जे वाचून तुम्ही कुत्र्याच्या प्रामाणिकपणाचं कौतुक कराल. ही घटना बंगालमधील नदिया जिल्ह्यातील आहे. नादिया जिल्ह्यातील नवद्वीप रेल्वे वर्कर्स कॉलनीतील आहे. येथे एक महिला भयंकर थंडीत आपल्या नवजात मुलाला बाथरूमच्या बाहेर सोडून निघून गेली. काही तासांपूर्वी या बाळाचा जन्म झाला होता. बाळाच्या अंगावर रक्ताचे डाग दिसत होते. त्याच्या अंगावर पांघरुणही नव्हतं. मात्र निर्दयी आई त्याला तशाच अवस्थेत सोडून निघून गेली.
थंडीत निर्जन रस्त्यावर नवजात बाळ
एका निर्जन रस्त्यावर कडाक्याच्या थंडीत रात्री नवजात बाळ रस्त्यावर रडत पडलं होतं. इतका वेळ हे बाळ कडक थंडीत कसं जगलं हे चमत्कारापेक्षा कमी नाही. भटके कुत्रे मुलावर हल्ला करून त्याला मारू शकले असते. पण त्याऐवजी, त्यांनी बाळासाठी एक संरक्षक वर्तुळ तयार केलं आणि रात्रभर त्याचे रक्षण केले. सकाळी सूर्य उगवला तेव्हा ते निघून गेले.
भटक्या कुत्र्यांनी घेतली काळजी...
घटनास्थळावर पोहोचलेली एक महिला सुकला मंडल म्हणाली, आम्ही जेव्हा तिथं गेलो, तेथील परिस्थिती पाहून अंगावर काटा उभा राहिला. नवजात बाळाच्या चहूबाजूने कुत्रे वर्तुळ करून उभे होते. मात्र कोणीही त्याच्यावर हल्ला केला नाही. ते भुंकत होते, बाळाचा जीव धोक्यात असल्याचा जणू इशारा देत होते. सुकला यांनी बाळाला ओढणीत गुंडाळलं आणि शेजारच्यांना तातडीने बोलावलं. ते बाळाला रुग्णालयात घेऊन गेले. बाळाची अवस्था पाहून त्याला दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आलं. त्याच परिसरात राहणारी दुसरी एक व्यक्ती सुभाष पाल यांनी सांगितलं, आम्हाला बाळाच्या रडण्याचा आवाज येत होता. मात्र कोणाच्या तरी घरात बाळ रडत असेल असं वाटलं किंवा कोणाचं बाळ आजारी असेल असं वाटून आम्ही दुर्लक्ष केलं. मात्र सकाळी जेव्हा आम्ही बाळाला कुत्र्यांसोबत पाहिलं तर आम्ही हैराण झालो. डॉक्टरांनी सांगितलं , बाळाच्या शरीरावर कुठेही जखमा नव्हत्या. त्याच्या डोक्यावर थोडं रक्त होतं, पण ते प्रसुतीदरम्यानचं होतं.
नक्की वाचा - Orange Gate-Marine Drive : रेल्वे खाली भुयारी मेट्रो नंतर बोगदा; मुंबईच्या 'पोटात' इंजिनियरिंगचा चमत्कार
नवजात बाळ कडाक्याच्या थंडीत जगणं आणि कुत्र्यांनी त्याला केलेले संरक्षण हा संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. कुत्र्यांच्या टोळ्यांनी एका लहान मुलावर हल्ला करून त्याला ठार मारल्याच्या बातम्या अनेकदा समोर येत असताना. एका रेल्वे कर्मचाऱ्याने सांगितलं की, हे तेच कुत्रे आहेत ज्यांच्याबद्दल आम्ही अनेकदा तक्रार केली आहे. पण त्यांची उदारता आश्चर्यकारक आहे.