Success Story: 14 वेळा अपयश, तरी ही डगमगली नाही, 15 व्या प्रयत्नात देशात 23 वी आली

"सतत प्रयत्न करत राहा, वेळ आल्यावर मेहनतीचे फळ नक्की मिळते," असा संदेश त्यांनी सर्व परीक्षार्थींना दिला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

सतत मिळालेले अपयश, खचलेला आत्मविश्वास आणि मानसिक ताण. अशा परिस्थितीत अनेक जण आपले पाऊल मागे घेतात. मात्र, मध्य प्रदेशातील पलेरा या छोट्या शहरातील आस्था दमेले यांनी या अपयशांना आपली ढाल बनवले. तब्बल 14 स्पर्धा परीक्षांमध्ये मिळालेल्या अपयशानंतरही त्यांनी हार मानली नाही. अखेर बिहार लोकसेवा आयोगाच्या (BPSC) परीक्षेत संपूर्ण देशात 23 वा क्रमांक पटकवत त्यांनी बिहार प्रशासकीय सेवेत (SDM) स्थान मिळवले आहे. आस्था यांनी आपल्या आजोबांचे स्वप्न अखेर पूर्ण केले. 

आस्था यांच्या या प्रवासाची सुरुवात कोणत्याही कोचिंग क्लासमधून झाली नाही. त्यांच्या आजोबांच्या एका वाक्यातून त्यांना सरकारी अधिकारी बनण्याची प्रेरणा मिळाली. "माझी मुलगी लाल दिव्याच्या गाडीत बसेल," हे आजोबांचे वाक्य आस्था यांच्या आयुष्याचे ध्येय बनले. पलेरामध्ये शिक्षणाची उत्तम सोय नव्हती. त्यामुळे तिच्या पालकांनी त्यांना सातवीत असताना छतरपूरला पाठवले. शालेय जीवनात नेहमी टॉपर राहिलेल्या आस्था यांना 2023 मध्ये पहिल्याच यूपीएससी (UPSC) प्रयत्नात अपयश आले. हा त्यांच्यासाठी मोठा धक्का होता.

Advertisement

नक्की वाचा - Success Story : 9 महिने नोकरी नाही, मग तरुणाने CV मध्ये बदलल्या 4 गोष्टी; थेट 50 लाख पॅकेजचा मिळाला जॉब 

यूपीएससीनंतर आस्था यांनी हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहार लोकसेवा आयोगाच्या परीक्षा दिल्या. यूपी पीसीएसमध्ये त्या मुख्य परीक्षेपर्यंत पोहोचल्या होत्या. पण तिथे ही यशाने हुलकावणी दिली. सततच्या 14 अपयशांनंतर त्यांनी योग आणि मेडिटेशनचा आधार घेतला. "दररोजची मेहनत हीच तुझी सर्वात मोठी उपलब्धी आहे," या भावाच्या सल्ल्याने त्यांना नवी ऊर्जा दिली. त्यांनी अभ्यासाचे नियोजन ठरवून रोजचे टार्गेट पूर्ण करण्यावर भर दिला. त्यात त्यांना मोठे समाधान आणि ताकदी ही मिळाली. 

नक्की वाचा - Ambernath News: 12 व्या मजल्यावरून ढकललं, परस्पर दफन करण्याचा ही प्रयत्न, पण तिसऱ्या डोळ्यामुळे गेम खल्लास

निकालाच्या दिवशी सुरुवातीला पहिल्या 3 क्रमांकांची नाव जाहीर करण्यात आली. त्यामध्ये आस्था यांचे नाव नव्हते. त्यामुळे आस्था निराश झाल्या होत्या. त्या दिल्लीतील करोल बाग येथील हनुमान मंदिरात गेल्या आणि प्रार्थना करू लागल्या. त्याच वेळी मित्राचा मेसेज आला की, त्यांची बिहार प्रशासकीय सेवेत निवड झाली आहे. त्यांनी अधिकृत यादीत स्वतःचे नाव पाहिले आणि अश्रू अनावर झाले. "सतत प्रयत्न करत राहा, वेळ आल्यावर मेहनतीचे फळ नक्की मिळते," असा संदेश त्यांनी सर्व परीक्षार्थींना दिला आहे.