- राजस्थानच्या दीपू कंवर यांनी लग्नानंतर सात वर्षांनी गुजरात न्यायिक सेवेच्या परीक्षेत यश मिळवले
- दीपू यांनी कौटुंबिक जबाबदाऱ्यांसह सासरच्या पाठिंब्यामुळे न्यायाधीश होण्याचं स्वप्न पूर्ण केलं
- दीपू यांना त्यांच्या पती लोकेंद्र सिंह यांनी अभ्यासासाठी प्रोत्साहन दिलं आणि घरकामातून पूर्णपणे मुक्त ठेवलं
लग्न झाल्यानंतर महिला करिअरकडे तेवढे लक्ष देत नाहीत. अनेक जणी आपल्या संसारात रमतात. मुलं बाळं झाली की तेच आपलं विश्व समजतात. पण काही महिला संसार करून मुलं बाळं संभाळून आपली स्वप्नपूर्ती करतात. अशीचे एक यशोगाथा समोर आली आहे. इथं एका महिलेने लग्नाच्या सात वर्षानंतर न्यायाधीश होण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे. त्यात तिला तिच्या सासरच्या लोकांचा मोठा पाठिंबा मिळाला. त्यामुळे तिला या यशाला गवसणी घालता आली.
राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातील जालीपा येथील रहिवासी असलेल्या दीपू कंवर यांनी गुजरात न्यायिक सेवेच्या (Gujarat Judicial Service) परीक्षेत यश मिळवलं आहे. त्यांनी राज्यात 79 वा रँक मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. लग्नानंतर कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे महिलांचे शिक्षण थांबते, असा समज मोडीत काढत दीपू यांनी हे यश मिळवले. विशेष म्हणजे, त्यांच्या या प्रवासात सासरच्या मंडळींनी दिलेली प्रेरणा आणि खंबीर पाठिंबा अत्यंत महत्त्वाचा ठरला. त्यांच्या पाठिंब्यामुळे दीपू यांनी यशाला गवसणी घातली आहे.
2019 मध्ये लोकेंद्र सिंह यांच्याशी विवाह झाला होता. तेव्हा दीपू एलएलबीच्या द्वितीय वर्षात होत्या. पती आणि सासू-सासऱ्यांनी त्यांना केवळ शिकण्यासाठी प्रोत्साहनच दिले नाही, तर घरातील कामातून पूर्णपणे मुक्त ठेवले. दीपू सांगतात की, "माझे सासरे अभ्यासाबाबत इतके गंभीर होते की, जर त्यांनी मला कधी घरकाम करताना पाहिले तर ते घरातील इतरांना ओरडत असत." पहिल्या प्रयत्नात मुलाखतीपर्यंत पोहोचूनही अपयश आले. मात्र हार न मानता तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी न्यायाधीशाची खुर्ची मिळवलीच.
दीपू यांना ५ वर्षांची मुलगी आहे. मातृत्वाची जबाबदारी आणि वकिलीचा सराव सांभाळत त्यांनी एलएलएम पूर्ण केले. घरच्या घरी अभ्यास करून हे यश खेचून आणले. पती लोकेंद्र सिंह यांनीच त्यांना न्यायाधीश होण्याचे स्वप्न दाखवले होते, जे दीपू यांनी प्रत्यक्षात उतरवले आहे. दीपू यांच्या मते, ही यशोगाथा केवळ त्यांची नसून त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची आहे. पती, सासू आणि सासरे यांच्या खंबीर पाठिंब्यामुळेच एका लहान मुलीची आई असूनही त्या हे उद्दिष्ट गाठू शकल्या.
त्या सांगतात की "मुलींनी लग्नानंतरही आपली स्वप्ने सोडू नयेत," असा संदेश त्यांनी या यशातून दिला आहे. पती लोकेंद्र सिंह स्वतः जयपूरमधून एलएलबी करत आहेत. त्यांनीच दीपू यांना या क्षेत्राची वाट दाखवली. सासरच्यांनी मुलीप्रमाणे माया दिल्यामुळेच आज एका ग्रामीण भागातील सून न्यायाधीशाच्या खुर्चीवर विराजमान होणार आहे. त्यांनी लग्नाच्या साता वर्षानंतर आपले स्वप्न पूर्ण केले आहे. त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतूक होत आहे.