Success Story: एखाद्या तरुणाला उद्ध्वस्त करण्यासाठी जेव्हा संपूर्ण जग एकत्र येतं, तेव्हा त्याच्याकडे दोनच पर्याय उरतात; एक तर गुडघे टेकणे किंवा परिस्थितीचे दात घशात घालून नवी ओळख निर्माण करणे. या जिद्दी तरुणाने दुसरा पर्याय निवडला. ज्या हातांना एकेकाळी खोट्या गुन्ह्यांच्या बेड्या ठोकल्या गेल्या, आज त्याच हातांमध्ये पोलीस उपअधीक्षक (DSP) पदाची जबाबदारी आली आहे.हातामध्ये बेड्या पडल्या असतानाही ज्याने डोळ्यातील स्वप्न मरू दिलं नाही, अशा एका जिद्दी तरुणाची ही गोष्ट आहे.
आयुष्याचा झाला होता थरारपट
या तरुणाची ही कहाणी एखाद्या मोठ्या बॉलिवूड चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. गरिबी, कुटुंबावर झालेला बहिष्कार, हक्काच्या जमिनीवर झालेला कब्जा आणि वारंवार होणारे जीवघेणे हल्ले अशा अनेक संकटांनी त्याला घेरले होते.
इतकेच नाही तर राजकारण आणि कोर्टाच्या फेऱ्यांमुळे संपूर्ण कुटुंब विखुरले गेले होते. आई-वडील हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत होते आणि घर जळून खाक झाले होते. अशा परिस्थितीत या तरुणाने हार मानण्याऐवजी लढण्याचा निर्णय घेतला.
( नक्की वाचा : Akola News : स्पर्धा परीक्षांसाठी राहते घर मोफत; एका वकिलामुळे दानापूरमधील 27 विद्यार्थी बनले सरकारी अधिकारी )
आईच्या हातावरील 'ती' शपथ
आयुष्यात अनेक वेळा संधी चालून आली होती. 2015 मध्ये पोलीस कॉन्स्टेबल भरती आणि 2017 मध्ये सब इन्स्पेक्टर परीक्षेत यश मिळवूनही केवळ नशिबाने आणि षडयंत्राने संधी हुकली. फिजिकल परीक्षेच्या दोन दिवस आधीच मुद्दामहून वाद घालून त्याला अडवण्यात आले. 2019 मध्ये शिक्षक म्हणून निवड झाली, पण त्याने जॉईन केले नाही.
खऱ्या संघर्षाला सुरुवात झाली एप्रिल 2020 मध्ये. त्याच्या आई-वडिलांवर जीवघेणा हल्ला झाला, घर जाळण्यात आले आणि त्यांच्यावरच खोटे गुन्हे दाखल करून तुरुंगात पाठवण्यात आले. 8 जानेवारी 2021 रोजी हा तरुण जेव्हा तुरुंगातून बाहेर आला, तेव्हा त्याचे सर्व कुटुंब आतच होते.
जून 2021 मध्ये तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाचा अपघात घडवून आणण्यात आला. रुग्णालयात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आईची अवस्था पाहून तो पूर्णपणे तुटला होता. पण त्याच वेळी त्याने आईची हात हातात घेतली आणि त्यावर एक शपथ लिहिली. त्याने वचन दिले की, "मी पूर्ण मेहनत करेन आणि आता थेट अधिकारी बनूनच परत येईन."
( नक्की वाचा : Success Story : आईच्या घामाचं सोनं! सफाई कामगार मातेची कन्या झाली MPSC अधिकारी, संघर्ष वाचून डोळे पाणावतील! )
भिंडचा वाघ आणि स्वप्नांची भरारी
हा तरुण दुसरा कोणी नसून मध्यप्रदेशातील भिंड जिल्ह्यातील डोंगरपुरा गावातील जैनेंद्र कुमार निगम आहे. जैनेंद्रचे वडील स्वतः एमपीपीएससी परीक्षेच्या मुख्य फेरीपर्यंत पाच वेळा पोहोचले होते, पण खोट्या गुन्ह्यांमुळे त्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले. वडिलांचे तेच स्वप्न उराशी बाळगून जैनेंद्रने अभ्यास सुरू ठेवला.
जैनेंद्र जेव्हा इंदूरमध्ये अभ्यास करत होता, तेव्हा त्याच्यावर पुन्हा एकदा हत्येच्या प्रयत्नाचा (कलम 307) खोटा गुन्हा दाखल झाला. मात्र, तो त्या वेळी हॉस्टेलमध्ये असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमुळे सिद्ध झाले. एमपीपीएससी 2023 च्या मुख्य परीक्षेवेळी त्याला मलेरिया आणि टायफॉइड झाला होता, तरीही अंगात ड्रिप लावून तो पेपर लिहायला बसला.
निकाल लागला आणि डोळे पाणावले
अखेर त्याच्या कष्टाला फळ मिळाले. एमपीपीएससी 2023 चा निकाल जाहीर झाला आणि जैनेंद्र कुमार निगम यांची निवड थेट डीएसपी (DSP) पदावर झाली. ज्या हातांना बेड्या ठोकून गुन्हेगार ठरवण्याचा प्रयत्न झाला, आज त्याच हातांना सलामी देण्याची वेळ आली आहे. ज्या वडिलांचे स्वप्न अपुरे राहिले होते, त्यांचा मुलगा आता राज्याचा पोलीस उपअधीक्षक झाला आहे. ही बातमी जेव्हा जैनेंद्रने वडिलांना सांगितली, तेव्हा त्यांच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू हे केवळ आनंदाचे नव्हते, तर अनेक वर्षांच्या अन्यायावर मिळालेल्या विजयाचे होते.