योगेश शिरसाट, प्रतिनिधी अकोला
Akola News : अकोला जिल्ह्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेले दानापूर हे गाव केवळ भाजीपाला उत्पादनासाठी नव्हे, तर आता स्पर्धा परीक्षेत अधिकारी घडवण्यासाठीही राज्यात चर्चेत आले आहे. भौगोलिकदृष्ट्या सुपीक जमीन आणि वान धरणाच्या पाण्यामुळे हे गाव आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे, परंतु येथील तरुण-तरुणींनी केवळ शेतीवर अवलंबून न राहता मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर स्पर्धा परीक्षेत लक्षणीय यश मिळवले आहे. जवळपास 8 हजार लोकसंख्या असलेल्या या गावात, स्व. पुंडलिकराव घायल कौटिल्य अभ्यासिका आणि ग्रंथालय हेच स्थान युवकांना मार्गदर्शन करत आहे. गावातील होतकरू आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या उद्देशाने, ॲड. विनय घायल यांनी आपले स्वतःचे राहते घर अभ्यासिकेसाठी निःशुल्क खुले करून दिले असून, त्यांनी या कार्यात मोठी गती आणली आहे.
कशी मिळाली प्रेरणा?
ॲड. घायल यांनी तरुणांसाठी काहीतरी करण्याचा संकल्प केला होता. 2012 मध्ये त्यांनी मोफत पुस्तके देऊन या उपक्रमाची सुरुवात केली. त्यांच्या या कार्यात महत्त्वाचा टर्निंग पॉइंट तेव्हा आला, जेव्हा काही गरजू विद्यार्थी अभ्यासासाठी खोली शोधत त्यांच्याकडे आले. त्याच क्षणी त्यांनी आपले घर कायमस्वरूपी अभ्यासिकेसाठी देण्याचा निर्णय घेतला. ते विद्यार्थ्यांना आत्मविश्वास देत म्हणाले, "स्पर्धा परीक्षेत यश मिळवून बाहेर पडा, तेच माझे भाडे!" या उपक्रमाला 2014 मध्ये पहिले मोठे यश मिळाले. तेव्हा अभ्यासिकेतील 10 पैकी तब्बल 6 विद्यार्थी शासकीय सेवेत दाखल झाले.
( नक्की वाचा : BR Gavai : निवृत्त होताच माजी सरन्यायाधीश गवई यांचा 'अफाट' निर्णय; राष्ट्रपती भवनात घडलेला 'तो' किस्सा काय? )
या यशानंतर अनेक विद्यार्थी स्वतः वर्गणी गोळा करून पुस्तके मागवू लागले, तर नोकरीत लागलेले माजी विद्यार्थी नवीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पुढे आले. या अभ्यासिकेतून आजपर्यंत विविध सरकारी विभागांमध्ये 27 अधिकारी कार्यरत झाले आहेत.

ग्रामीण भागात असूनही अनेक मर्यादांवर मात करत येथील विद्यार्थ्यांनी मोठे यश मिळवले आहे. सुरुवातीला विजेच्या समस्येमुळे अनेक वर्षे विद्यार्थ्यांना मेणबत्तीच्या प्रकाशात, जमिनीवर बसून अभ्यास करावा लागला. मात्र आता ॲड. घायल यांनी विद्यार्थ्यांसाठी खुर्च्या, वैयक्तिक केबिनची व्यवस्था केली आहे. स्पर्धा परीक्षांचे ऑनलाईन क्लासेस, प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार असे उपक्रम नियमितपणे आयोजित केले जातात.
विद्यार्थ्यांना अद्ययावत ऑनलाईन मार्गदर्शनाचा लाभ घेता यावा म्हणून अभ्यासिकेत प्रोजेक्टर आणि संगणक बसवण्यात आले, ज्याचे लोकार्पण तेल्हारा तहसीलदार समाधान सोनवणे यांच्या हस्ते झाले. या अभ्यासिकेला अधिकारी, ठाणेदार आणि माजी शिक्षकांकडून सतत प्रोत्साहन आणि मार्गदर्शन मिळत असल्याने विद्यार्थ्यांचे मनोबल वाढले आहे.
( नक्की वाचा : Akola News : गुंतवणुकीचे आमिष दाखवत कोट्यवधींची फसवणूक; सायबर गुन्ह्यांमधील 'नागपूर मॉडेल' उद्ध्वस्त )
मुख्यमंत्र्यांकडून दखल
या कौटिल्य अभ्यासिकेच्या कार्याची दखल मुख्यमंत्री कार्यालयानेही घेतली आहे. विविध समस्यांवर उत्कृष्ट काम करणारे आणि सध्या मुख्यमंत्री यांचे प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले राजेंद्र खंदारे यांनी अभ्यासिकेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. अभ्यासिकेचे संचालक ॲड. विनय घायल यांनी आपला ध्येय स्पष्ट करताना सांगितले की, "या छोट्या रोपट्याचा विशाल वृक्ष व्हावा, प्रत्येक विद्यार्थी वर्ग-1 अधिकारी व्हावा आणि त्यांच्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना रुजावी, हेच आमचे अंतिम ध्येय आहे." या अभ्यासिकेचे मार्गदर्शन आपल्या यशात अमूल्य असल्याचे सांगणारे माजी विद्यार्थी महादेव खोणे आज पोलीस भरतीतून पुढे PSI म्हणून सोनाळा पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world