Success Story : करियरबाबत तरुणांचा विचार आणि आवड जलद गतीने बदलत आहे. आधी मोठ्या रकमेचा पगार आणि बड्या कंपन्या तरुणांना आकर्षित करीत होत्या. आता हा विचार बदलला आहे. आता तरुणांना कामाच्या ठिकाणी असलेलं स्वातंत्र्य, मानसिक स्वास्थ आणि समाधान महत्त्वाचं वाटतं. सोशल मीडियावरही अनेक तरुण याबाबत व्यक्त होत असतात. काही प्रकरणं तर लोकांना विचार करायला भाग पाडतात. यश नेमकं काय असतं? एक एमबीए पदवीधर तरुणाने २५ लाखांची नोकरी सोडून ड्रायव्हरचा व्यवसाय निवडला. सुरुवातीला कुटुंबीयांनी त्याला खूप दुषणं दिली. मात्र काही वर्षात चित्र बदललं.
मोठा पगार, पदवीतूनही समाधान नाही...
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका पोस्टमधून या तरुणाने सर्वांनाच हैराण केलं आहे. त्याने टियर-२ कॉलेजमधून एमबीएचं शिक्षण घेतलं आणि त्याला वार्षिक २५ लाखांचं पॅकेजही मिळालं. कोणत्याही विद्यार्थ्यासाठी हा ड्रिम जॉब मानला जातो. या नोकरीमुळे त्याचं भविष्य सुरक्षित होतं, मात्र तरुणाने जे केलं ते पाहून कोणीही हैराण झालं. त्याने २५ लाखांची नोकरी सोडून ड्रायव्हर होण्याचा निर्णय घेतला. यामागे नोकरीचे तास, सातत्याने काम करण्याचा दबाव आणि खासगी आयुष्यात वेळ देता येत नसल्याने तो त्रस्त होता. तो काम तर करीत होता, मात्र त्याला कामाचा आनंद मिळत नव्हता.
नक्की वाचा - 'एका लहानग्याने' उडवली भारताची झोप, जगभरात उडाली खळबळ
नोकरी सोडण्याचा घेतला निर्णय...
बराच विचार केल्यानंतर त्याने आयुष्यातील मोठा निर्णय घेतला. त्याने आपली नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय जोखमीचा होता. कारण कोणत्याही व्यक्तीसाठी इतकी मोठी सॅलरीची नोकरी सोडणं सोपं नसतं. नोकरी सोडल्यानंतर त्याने ओला कॅब चालविण्याचं काम सुरू केलं. नातेवाईक, कुटुंबीय आणि ओळखीची व्यक्ती त्याला खूप बोलले. मात्र त्याने कुणाचंही ऐकलं नाही आणि आपल्या कामावर फोकस केला.
असे कमावले ६.५ लाख...
सुरुवातील त्याला चांगले पैसे मिळत नव्हते. मात्र तरीही तो मागे हटला नाही. त्याने आपल्या कामात बदल केला आणि थोडे थोडे पैसे जमा करण्यास सुरू केलं. काही वेळानंतर त्याने स्वत:ची कार खरेदी केली. यानंतर त्याने दुसरी कार खरेदी केली. हळूहळू त्याने ड्रायव्हिंगशिवाय व्यवसाय करण्याचा विचार सुरू केला. त्याने गाड्यांची संख्या वाढवली आणि अन्य लोकांना कामावर ठेवलं. अशा पद्धतीने त्याचं काम हळूहळू मोठ्या ट्रान्सपोर्ट बिझनेसमध्ये बदलला. तीन वर्षांच्या मेहनतीनंतर त्याचं संपूर्ण आयुष्य बदललं. आता तो केवळ एक ड्रायव्हर नाही तर एक व्यावसायिक झाला. त्याच्याजवळ १२ गाड्या आहेत आणि तो त्या गाड्या मॅनेज करतो. आता दरमहिना तो तब्बल ६.५ लाख रुपये कमावतो. जो रस्ता लोकांना सुरुवातीला चुकीचा वाटत होता, तोच रस्ता त्याला यशाच्या शिखरावर घेऊन गेला. आजतकने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.