- राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातील बगडिया का बास येथील एका कुटुंबातील आई आणि मुलीने अभूतपूर्व यश मिळवले आहे
- अभिलाषा चौधरीने NEET-UG २०२६ मध्ये १०१९ वी रँक मिळवून सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवला आहे
- सुमन चौधरी यांनी राजस्थान शाळा व्याख्याता भरती परीक्षेत लेक्चरर पदावर नियुक्ती झाली आहे
आई आणि मुलीने एकाच वेळी अशी काही कामगिरी केली की त्याचं कौतूक संपूर्ण राज्यत होत आहे. आई नंबर वन तर लेक ही मागे राहीली नाही. राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातील लक्ष्मणगड परिसरातील बगडिया का बास येथे एकाच कुटुंबातील आई आणि मुलीने अभूतपूर्व यश संपादन केले आहे. मुलगी अभिलाषा चौधरी हिने NEET-UG 2026 मध्ये 1019 वी रँक पटकावली आहे. तर तिची आई सुमन चौधरी यांची लेक्चरर (Lecturer) पदी निवड झाली आहे. एकाच वेळी मिळालेल्या या दुहेरी यशामुळे संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. तर परिसरात कौतुकाचा वर्षाव होत आहे.
अभिलाषाला गेल्या वर्षी बांसवाडा येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला होता. पण तिला चांगल्या कॉलेजला प्रवेश हवा होता. त्यामुळे तिने त्यावेळी तो प्रवेश नाकारला होता चांगल्या कॉलेजसाठी ती पुन्हा जोमाने तयारीला लागली होती. आता तिने NEET-UG 2026 मध्ये 1019 वी रँक मिळवली आहे. शिवाय यातून तिने आपले स्वप्न ही पूर्ण केले. लेकीने दमदार कामगिरी केल्यानंतर आई तरी कशी मागे राहाणार. आईने ही याच वेळी जबरदस्त कामगिरी करत लेक्चरर पदाला गवसणी घातली आहे. त्यामुळे एकाच घरात दोघींनी दोन मोठे यशाचे मोठे धमाके केले आहेत.
अभिलाषाची आई सुमन चौधरी यांनी राजस्थान शाळा व्याख्याता भरती परीक्षेत हिंदी विषयातून 113 वी रँक मिळवली आहे. April 2026 मध्ये त्या व्याख्याता बनल्या. सुमन चौधरी यांचे सरकारी सेवेतील हे तिसरे यश आहे. यापूर्वी 2017 मध्ये लेव्हल-2 आणि 2019 मध्ये लेव्हल-1 शिक्षक म्हणून त्यांची निवड झाली होती. या दोघांनी मिळवलेल्या यशाने कुटुंबातील सर्वच जण भारावून गेले आहेत. शिवाय दोघींचे संपूर्ण जिल्ह्यात कौतूक होत आहे. आई आणि मुलीचे हे यश म्हणजे समाजा समोर एक वेगळेच उदाहरण म्हणावे लागेल. त्यातून प्रत्येकानेच प्रेरणा घ्यावी असं आहे.
अभिलाषाने तिच्या यशाचे श्रेय नियमित अभ्यास, मॉक टेस्ट आणि शिस्तबद्धतेला दिले आहे. तिने अभ्यासात कधी ही खंड पडू दिला नाही. तर कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून आईने मिळवलेले यश सर्व महिलांसाठी प्रेरणादायी आहे. कुटुंबातील आजोबा ओमप्रकाश बगडिया हे निवृत्त शिक्षक आहेत. वडील मनोज कुमार आणि चुलती प्रियंका सरकारी शिक्षक आहेत. काका सुभाष हे दिल्ली पोलिसात आहेत. या कुटुंबात शिक्षणाला संस्कार मानले जाते. आता या दोघींनी ही यशाचं शिखर गाठलं आहे. आई आणि मुलगी काय करू शकतात हे या दोघींनी ही दाखवून दिलं आहे.