संघर्ष केला, जिद्द ठेवली तर काही करून दाखवता येणे शक्य आहे. अशीच एक संघर्ष आणि जिद्दीची कहाणी समोर आली आहे. दुसऱ्यां समोर आदर्श ठेवावा अशीच ही कहाणी म्हणावी लागेल. एका ट्रॅक्स ड्रायव्हरने आपल्या मुलीला शिकवण्यासाठी वाट्टेल ते केलं. तिच्या शिक्षणासाठी कर्ज ही काढलं. बापाने आपल्यासाठी केलेल्या धडपडीचं चिज लेकीनं केलं. ही यशाची कहाणी आहे राजस्थानमधल्या जैसलमेरमधील रामदेवरा येथल्या रक्षा शर्मा हीची. तिने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून राजस्थान प्रशासकीय सेवा (RAS) परीक्षेत 570 वी रँक मिळवून अंतिम निवड यादीत स्थान प्राप्त केले आहे. ही निवड केवळ रक्षाची वैयक्तिक यशोगाथा नसून, मर्यादित संसाधने असलेल्या कुटुंबासाठी एक प्रेरणादायी घटना आहे.
रक्षाचे वडीलांचे नाव मदन शर्मा आहे. हे केवळ 8 वी पर्यंत शिकलेले आहेत. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी अनेक वर्षांपासून ते टॅक्सी चालवत आहेत. आर्थिक अडचणींमुळे वडिलांनी रक्षाच्या शिक्षणासाठी अनेकांकडून कर्ज घेतले. ज्याचे हप्ते आणि व्याज ते आजही फेडत आहेत. संपूर्ण कुटुंब एकाच खोलीत राहात असतानाही, मदन शर्मा यांनी आपल्या मुलीच्या स्वप्नांना पाठबळ देण्यासाठी कोणतीही कमतरता भासू दिली नाही. तिला शिकवण्यासाठी मेहनत घेतलीच. पण तिला प्रोत्साहन ही दिलं. त्यांच्या मेहनतीचं चिज लेकीनं ही करून दाखवलं.
लेकीचं यश पाहून तिचे वडील मदन शर्मा भावूक झाले. यांनी आपली भावना व्यक्त करताना सांगितले की, "माझ्यात जास्त शिकण्याची ताकद नव्हती, पण मी लेकीसाठी रात्रंदिवस मेहनत घेतली. आज तिने माझा संघर्ष यशस्वी केला, माझी लाज राखली असं करत त्यांनी आपल्या आश्रूंना वाट करून दिली. ग्रामीण भागातील मुलींना एकट्याने बाहेर पाठवणे कठीण असतानाही, वडिलांनी रक्षाला जोधपूर आणि जयपूर येथे जाऊन तयारी करण्याची पूर्ण स्वतंत्रता दिले होते. राजस्थान सारख्या राज्यात एका ग्रामिण भागातल्या मुलीला ऐवढी सुट देणं हे ही मोठी गोष्ट होती. ती मद यांनी केली.
पहिल्या प्रयत्नात अपयश आल्यानंतर रक्षाने हार मानली नाही. तिने आपल्या कमजोरींवर काम केले. कठोर परिश्रम केले. दिवसाला 8, 10, आणि कधीकधी 12 तास अभ्यास करून तिने आपले लक्ष्य गाठले. सामाजिक, धार्मिक आणि वैवाहिक कार्यक्रमांपासून तिने स्वतःला दूर ठेवले. कारण तिचे लक्ष्य स्पष्ट होते. रक्षाने मुलाखतीनंतरच आपल्या निवडीबद्दल आत्मविश्वास व्यक्त केला होता. मुलाखतीत तिला तिच्या गृहजिल्हा जैसलमेर संबंधित प्रश्न विचारण्यात आले होते. ज्यांची उत्तरे तिने आत्मविश्वासाने दिली. रक्षाची आई मैना देवी यांनी अत्यंत भावूक होत, इतर पालकांना आवाहन केले की त्यांनी आपल्या मुलींना उच्च शिक्षणासाठी पाठिंबा द्यावा. त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास प्रोत्साहित करावे. या यशामुळे शर्मा कुटुंबाचे भविष्य निश्चितपणे बदलणार आहे.