- तामिळनाडूच्या व्ही. श्रीपथी या 23 वर्षीय तरुणीने पहिल्या महिला आदिवासी न्यायाधीशपदाचा मान मिळवला आहे
- बाळाला जन्म दिल्यानंतर दोन दिवसांनी 250 किलोमीटर प्रवास करून दिवाणी न्यायाधीश पदाची परीक्षा दिली
- श्रीपथी यांचे शिक्षण येलागिरी हिल्समध्ये झाले असून लग्नानंतरही त्यांनी अभ्यास सुरू ठेवला
V Sripathi Success Story: तामिळनाडूच्या तिरुवन्नमलाई जिल्ह्यातील एका दुर्गम गावातील 23 वर्षीय तरुणीने जिद्दीच्या जोरावर इतिहास घडवला आहे. व्ही. श्रीपथी यांनी तामिळनाडूच्या पहिल्या महिला आदिवासी न्यायाधीश होण्याचा मान पटकावला आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि शारीरिक आव्हानांवर मात करत त्यांनी मिळवलेले हे यश सामाजिक न्यायाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहे. त्यांनी यातून लढवय्या वृत्तीचे दर्शन घडवले आहे. शिवाय आदिवासी समाजातील मुलींसमोर नवा आदर्श ठेवला आहे.
श्रीपथी यांचे शिक्षण येलागिरी हिल्समध्ये झाले. कायद्याचे शिक्षण घेत असतानाच त्यांचा विवाह झाला. मात्र त्यांनी आपले ध्येय सोडले नाही. सर्वात थक्क करणारी बाब म्हणजे, ज्या दिवशी त्यांची दिवाणी न्यायाधीश पदाची परीक्षा होती, त्याच्या अवघ्या 48 तास आधी त्यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला. डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला होता. पण त्यांना त्यांचे लक्ष्य गाठायचे होते. त्यांनी कसली ही चिंता केली नाही. श्रीपथी यांनी त्या दिवशी 250 किमीचा प्रवास करून परीक्षा केंद्र गाठले. शिवाय उत्साहाने आणि तेवढ्याच आत्मविश्वासाने पेपर दिला.
परीक्षेनंतर त्या मुलाखतीतही उत्तीर्ण झाल्या. त्यांच्या या यशाचे पडसाद संपूर्ण देशात उमटले आहेत. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी श्रीपथी यांचे अभिनंदन करताना म्हटले की, "हे यश म्हणजे द्रविडीयन मॉडेल आणि सामाजिक परिवर्तनाचे उत्तम उदाहरण आहे." म्हणतात ना, 'इच्छा तिथे मार्ग'. हेच पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं आहे. तामिळनाडूच्या 23 वर्षांच्या व्ही. श्रीपथी या डोंगरदऱ्यात राहणाऱ्या एका सामान्य मुलीने आज राज्याची पहिली आदिवासी महिला न्यायाधीश बनून दाखवलंय. त्यांचा हा प्रवास ऐकताना अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाहीत.
श्रीपथी या मलयाली जमातीतील आहेत. लग्नानंतर अभ्यास करणं सोपं नव्हतं, पण पती आणि सासरच्यांच्या मदतीने त्यांनी अभ्यास सुरू ठेवला. परीक्षेच्या दोन दिवस आधीच त्यांची डिलिव्हरी झाली. अंगात त्राण नसतानाही केवळ जिद्दीच्या जोरावर त्यांनी आपल्या नवजात बाळाला नातेवाइकांकडे सोपवून 250 किमी लांब असलेल्या परीक्षा केंद्रावर धाव घेतली. नुकत्याच जन्मलेल्या लेकराला सोडून पेपर लिहिणं सोपं नव्हतं, पण त्यांना स्वतःचं भविष्य आणि समाजाचं नाव उज्ज्वल करायचं होतं. निकाल लागला आणि श्रीपथी न्यायाधीश झाल्याची बातमी गावात पोहोचताच जल्लोष साजरा करण्यात आला. त्यांच्या यशाने आज अनेक मुलींना स्वप्न पाहण्याची ताकद दिली आहे. एका आईची ही जिद्द पाहून सध्या सोशल मीडियावर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.