दिवंगत उद्योगपती संजय कपूर यांच्या मृत्यूपत्राच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या आणि त्यांच्या मालमत्तेच्या वाटणीसाठी दाखल केलेल्या वाटणी दाव्यावर (Partition Suit) बुधवारी दिल्ली उच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी झाली. संजय कपूर आणि करिश्मा कपूर यांची मुलगी समैरा कपूर आणि अन्य काही जणांनी ही याचिका दाखल केली आहे. (Karishma Kapoor vs Priya Sachdev-Kapur) संजय कपूर याच्या संपत्तीत वाटा मिळावा ही याचिकाकर्त्यांची प्रमुख मागणी होती. याचिकाकर्त्यांनी संजय कपूर याच्या मृत्यूपत्रावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
नक्की वाचा: 'मी तर विधवा, तू तर नवऱ्याला सोडून गेली', करिश्मा कपूर अन् प्रिया कपूरमध्ये कोर्टात संपत्तीवरून घमासान
कोर्टात काय घडले ?
न्यायमूर्ती ज्योती सिंग यांच्या खंडपीठापुढे सदर प्रकरणाची सुनावणी झाली होती. यावेळी न्यायालयाने याचिकाकर्त्यांनी केलेली अंतरिम संरक्षणाबद्दलची विनंती फेटाळून लावली. न्यायालयाने संजय कपूर याची विधवा पत्नी प्रिया कपूर आणि त्यांचा मुलगा अझारिया यांना लेखी उत्तर सादर करण्यास सांगितले असून त्यासाठी 3 आठवड्यांचा अवधी देण्यात आला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 9 ऑक्टोबर रोजी होणार आहे. न्यायालयाने करिश्मा कपूरच्या मुलीला आणि अन्य याचिकाकर्त्यांना मृत्यूपत्राची प्रत हवी असल्याने एनडीए(Non-Disclosure Agreement)वर सही करण्यास सांगितले आहे.
प्रकरण नेमके काय आहे ?
करिश्मा कपूरची दोन्ही मुले समायरा आणि कियान यांनी त्यांची सावत्र आई प्रिया सचदेव-कपूर हिच्याविरोधात याचिका दाखल केली आहे. प्रियाने संजय कपूरच्या मृत्यूपत्रात गैरप्रकाराने बदल केले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रियाने संजय कपूरची संगळी संपत्ती हडप केल्याचा आरोप करण्यात आला आहे. कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान प्रियाच्या वकिलांनी म्हटले की, संजय कपूर यांनी एका ट्रस्टची स्थापना केली होती. सदर खटला दाखल होण्याच्या 5 दिवस आधीच 1900 कोटींची संपत्ती संजय आणि करिश्मा कपूरच्या मुलांना मिळाली आहे.
नक्की वाचा: 'वडील वारले आणि...'; संजय कपूर यांच्या मालमत्तेसाठी करिश्मा कपूरच्या मुलाचा सावत्र आईवर आरोप
प्रिया कपूरच्या वतीने राजीव नायर, शैल त्रेहन यांनी युक्तिवाद केला. मेघना मिश्रा यांनी या दोघांना सहाय्य केले. अजारिया तपूर याच्या वतीने अखिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. याचिकाकर्त्यांच्या वतीने अंकित राडगढिया, तरुण शर्मा आणि रोहित कुमार यांनी युक्तिवाद केला. प्रिया कपूरने घेतलेल्या भूमिकेमुळे हे प्रकरण चिघळण्याची शक्यता असून पुढील सुनावणीदरम्यान काही स्फोटक बाबी समोर येण्याची शक्यता आहे.