पश्चिम बंगालमधील भाजप नेते सुवेंदु अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक (PA) चंद्रनाथ रथ यांच्या हत्येमुळे राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणावर सुवेंदु अधिकारी यांनी अत्यंत गंभीर विधान केले आहे. "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जी यांचा पराभव केला, म्हणूनच सूडबुद्धीने चंद्रनाथची हत्या करण्यात आली," असा थेट आरोप अधिकारी यांनी तृणमूल काँग्रेसवर केला आहे. भाजप नेते सुवेंदु अधिकारी यांच्या पीएची हत्या ही राजकीय वैमनस्यातून झाल्याचे आता स्पष्ट होत आहे. सुवेंदु अधिकारी यांनी थेट ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधत ही हत्या म्हणजे भवानीपूरमधील पराभवाचा बदला असल्याचे म्हटले आहे.
या घटनेमुळे बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. वायुसेनेत सेवा बजावलेले चंद्रनाथ रथ हे अधिकारी यांचे 'संकटमोचक' मानले जात होते. त्यांची अशा प्रकारे हत्या होणे हे बंगालच्या राजकारणातील हिंसक वळण दर्शवते. चंद्रनाथ रथ यांची मध्यमग्राम भागात दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. या घटनेचा निषेध करताना सुवेंदु अधिकारी म्हणाले की, ही हत्या पूर्णपणे सुनियोजित होती. पोस्टमार्टम रिपोर्टनुसार त्यांच्यावर 4 गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. केवळ माझे निकटवर्तीय असल्यानेच त्यांना लक्ष्य करण्यात आले, असा दावा अधिकारी यांनी केला आहे.
चंद्रनाथ हे गेल्या 20 वर्षांपासून सुवेंदु अधिकारी यांचे विश्वासू सहकारी म्हणून काम करत होते. या हल्ल्यात केवळ चंद्रनाथच नाही, तर सुवेंदु अधिकारी यांचा कार चालक बुद्धदेव बेरा हा देखील गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती अजूनही नाजूक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. त्याच्यावर दोन मोठ्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून सध्या तो अतिदक्षता विभागात (ICU) देखरेखीखाली आहे. पश्चिम बंगालमध्ये राजकीय हिंसाचाराचे सत्र थांबायचे नाव घेत नाही असचं म्हणावे लागेल. निवडणूक निकालानंतर हा हिंसाचार उसळला आहे.
"मी ममता बॅनर्जींना हरवलं, त्याची शिक्षा माझ्या माणसाला मिळाली," अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. चंद्रनाथ रथ यांच्या निधनाने भाजपला मोठा धक्का बसला आहे. पूर्व मेदिनीपूरचे रहिवासी असलेले रथ गेल्या दोन दशकांपासून अधिकारी यांच्या सोबत सावलीसारखे उभे होते. बुधवारी रात्री मध्यमग्राम येथे ही दुर्दैवी घटना घडली. अधिकारी यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.