Thalapathy Vijay Set to Become Tamil Nadu CM: तमिळनाडूच्या राजकारणात एक मोठी ऐतिहासिक घडामोड घडलीय. सुपरस्टार विजय यांच्या सत्तेचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. निवडणुकीच्या निकालानंतर बहुमताचा आकडा गाठण्यासाठी विजय यांना मोठी कसरत करावी लागत होती, मात्र आता त्यांच्यासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
विदुथलाई चिरुथाईगल कात्ची म्हणजेच व्हीसीके (VCK) या पक्षाने विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम या पक्षाला बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे विजय यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने बहुमताचा आकडा यशस्वीपणे गाठला असून, आता तामिळनाडूमध्ये सत्तास्थापनेचा आणि शपथविधीचा मार्ग मोकळा झाला आहे.
व्हीसीकेचा निर्णायक पाठिंबा आणि बहुमताचे गणित
तामिळनाडू विधानसभेत सत्ता स्थापन करण्यासाठी एकूण 118 आमदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. विजय यांच्या नेतृत्वाखालील आघाडीकडे आधीच 116 आमदारांचे बळ होते, ज्यामध्ये काँग्रेसचे 5 आणि डाव्या पक्षांच्या 4 आमदारांचा समावेश होता.
आता व्हीसीके या पक्षाने आपल्या 2 आमदारांचा बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्यामुळे विजय यांच्या आघाडीचे संख्याबळ बरोबर 118 झाले आहे. यामुळे बहुमतासाठी आवश्यक असलेली मॅजिक फिगर आता विजय यांच्या खिशात आली आहे. विशेष म्हणजे व्हीसीकेने अद्याप याची अधिकृत घोषणा केली नसली तरी, विश्वसनीय सूत्रांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
( नक्की वाचा : कोर्टात गायलं गाणं अन् न्यायाधीशांनीच काढलं तिकीट! PM मोदी ज्यांच्या पाया पडले ते 97 वर्षांचे माखनलाल सरकार कोण? )
पाच पक्षांची महाआघाडी आणि सत्तेचे समीकरण
व्हीसीकेच्या समावेशामुळे आता विजय यांच्या आघाडीमध्ये एकूण 5 पक्षांचा समावेश झाला आहे. यामध्ये टीव्हीकेसह काँग्रेस, सीपीआय आणि सीपीएम या पक्षांचा समावेश आहे. डाव्या पक्षांनी यापूर्वीच विजय यांना बिनशर्त पाठिंबा दिला आहे, तर काँग्रेसने काही अटींसह आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, डाव्या पक्षांनी मंत्रिमंडळात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे, तर काँग्रेसने मात्र मंत्रिमंडळात 2 मंत्रीपदांची मागणी केली असल्याचे समजते.
द्रविडी राजकारणातील 62 वर्षांची मक्तेदारी संपली
या निवडणुकीने तामिळनाडूच्या राजकारणात एक नवीन अध्याय लिहिला आहे. गेल्या 62 वर्षांपासून तामिळनाडूच्या सत्तेवर डीएमके आणि एआयएडीएमके या दोन मोठ्या द्रविडी पक्षांची पकड होती. मात्र, विजय यांच्या टीव्हीके पक्षाने ही मक्तेदारी मोडीत काढली आहे. टीव्हीके हा 108 जागा जिंकून राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. खुद्द विजय यांनी 2 जागांवर विजय मिळवला असून सध्या त्यांच्या पक्षाकडे 107 आमदार आहेत.
निवडणुकीतील इतर पक्षांची स्थिती
यावेळच्या निवडणुकीत प्रस्थापित पक्षांना मोठा फटका बसल्याचे पाहायला मिळत आहे. सत्ताधारी डीएमकेला केवळ 59 जागांवर समाधान मानावे लागले आहे, तर एआयएडीएमकेला फक्त 47 जागा मिळाल्या आहेत.
इतर पक्षांमध्ये काँग्रेसने 5, पीएमकेने 4, तर व्हीसीके, आययुएमएल, सीपीआय आणि सीपीएम या पक्षांनी प्रत्येकी 2 जागा जिंकल्या आहेत. भाजप, डीएमडीके आणि एएमएमके या पक्षांना प्रत्येकी 1 जागा मिळाली आहे. या सर्व राजकीय समीकरणांमुळे आता विजय यांच्या रूपाने तामिळनाडूला एक नवा मुख्यमंत्री मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.