Suvendu Adhikari Oath Ceremony : पश्चिम बंगालच्या राजकारणात आजचा दिवस (शनिवार, 9 मे 2026) ऐतिहासिक आहे. आजच्याच दिवशी बंगालमध्ये पहिलं भाजपा सरकार सत्तेत आलं. सुवेंदू अधिकारी हे बंगालचे पहिले भाजपा मुख्यमंत्री झाले. अधिकारी सरकारच्या शपथविधी कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. मोदी यांनी यावेळी एका 97 वर्षांच्या ज्येष्ठ भाजपा कार्यकर्त्यांचे पाया पडून आशीर्वाद घेतले आणि त्यांना मिठी मारली.संपूर्ण देशासमोर पंतप्रधान ज्यांच्यासमोर नतमस्तक झाले ते नक्की कोण आहेत? हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
पंतप्रधानांनी ज्यांचा सन्मान केला ते नाव म्हणजे माखनलाल सरकार. पश्चिम बंगालमधील सिलिगुडीचे रहिवासी असलेले माखनलाल सरकार हे भारतीय जनता पक्षाच्या सुरुवातीच्या काळातील सर्वात ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. केवळ राजकीय नेता म्हणूनच नव्हे, तर जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख होती. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या काश्मीर दौऱ्यात माखनलाल सरकार त्यांच्यासोबत सावलीसारखे होते.
PM Modi honours veteran BJP leader Makhanlal Sarkar ahead of oath-taking ceremony at Brigade Parade ground pic.twitter.com/GoigITiy8f
— NDTV (@ndtv) May 9, 2026
न्यायालयात गायले देशभक्तीपर गीत
माखनलाल सरकार यांच्या आयुष्यातील एक किस्सा आजही कार्यकर्त्यांमध्ये अभिमानाने सांगितला जातो. काँग्रेसच्या काळात एका देशभक्तीपर गीतासाठी त्यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले, तेव्हा न्यायाधीशांनी त्यांना माफी मागण्यास सांगितले.
मात्र, आपण कोणताही गुन्हा केलेला नाही, फक्त गीत गायले आहे, असे ठामपणे सांगत त्यांनी माफी मागण्यास नकार दिला. इतकेच नाही तर न्यायाधीशांच्या विनंतीवरून त्यांनी ते गीत पुन्हा भर न्यायालयात गायले. त्यांचा तो बाणा पाहून न्यायाधीशांनी पोलिसांना त्यांना सन्मानाने आणि प्रथम श्रेणीचे तिकीट देऊन घरी सोडण्याचे आदेश दिले होते, तसेच प्रवासासाठी 100 रुपये दिले होते.
( नक्की वाचा : Suvendu Adhikari : कोण आहेत सुवेंदू अधिकारी? ज्यांच्या एका निर्णयाने बंगालच्या राजकारणाचा चेहरामोहराच बदलला )
श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे निकटवर्तीय
बंगाल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष समिक भट्टाचार्य यांनी माखनलाल सरकार यांच्याबद्दल अधिक माहिती दिली. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा काश्मीरमधील तुरुंगात संशयास्पद मृत्यू झाला, तेव्हा त्यांच्या अंतिम प्रवासातही माखनलाल सरकार सोबत होते.
1952 मध्ये काश्मीरमध्ये तिरंगा फडकवण्यासाठी चाललेल्या आंदोलनात मुखर्जी यांच्यासोबत त्यांनाही अटक करण्यात आली होती. स्वातंत्र्यानंतरच्या राष्ट्रवादी चळवळीतील ते एक महत्त्वाचे साक्षीदार मानले जातात.
( नक्की वाचा : Bengal Election 2026: बंगालमध्ये कमळ फुलताच मोदींना झाली 'त्यांची' आठवण; कोण होते डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी?)
भाजपाच्या बांधणीत मोठे योगदान
1980 मध्ये भाजपची स्थापना झाल्यानंतर माखनलाल सरकार यांनी पश्चिम दिनाजपूर, जलपाईगुडी आणि दार्जिलिंग या जिल्ह्यांची जबाबदारी सांभाळली. त्यांनी केवळ एका वर्षामध्ये 10000 पेक्षा जास्त सदस्यांची नोंदणी करून पक्षात चैतन्य निर्माण केले होते.
1981 पासून सलग 7 वर्षे त्यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिले. भाजपामध्ये सामान्यतः एका पदावर 2 वर्षांपेक्षा जास्त काळ कोणाला ठेवले जात नसे, मात्र माखनलाल सरकार यांची कामाची पद्धत आणि निष्ठा पाहून त्यांना सातत्याने ही जबाबदारी देण्यात आली होती. आज 97 व्या वर्षीही त्यांची पक्षाबद्दलची असलेली निष्ठा पाहून पंतप्रधानांनी त्यांचा जाहीर सन्मान केला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world