- केंद्र सरकार २०२६ च्या अखेरीस मल्टि-लेन फ्री फ्लो ही अत्याधुनिक टोल प्रणाली देशभरात लागू करणार आहे
- नवीन प्रणाली एआय आधारित असून उपग्रहांच्या मदतीने वाहनांच्या नंबर प्लेटची ओळख पटवून टोल वसुली होईल
- एमएलएफएफ प्रणालीमुळे वाहने ८० किलोमीटर प्रति तास वेगाने थांबण्याशिवाय टोल नाका पार करू शकतील
देशातील टोल नाक्यांवर लागणाऱ्या रांगा आणि वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी केंद्र सरकार आता 'मल्टि-लेन फ्री फ्लो' (MLFF) ही अत्याधुनिक टोल प्रणाली लागू करणार आहे. 2026 च्या अखेरीस ही प्रणाली देशभरात पूर्णपणे कार्यान्वित होईल, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत दिली. यामुळे इंधनाची मोठी बचत होण्यासोबतच सरकारच्या महसुलातही वाढ होणार आहे. 2026 पर्यंत देशातील सर्व टोल नाके 'एआय' (AI) समर्थित होणार असून, तुमची कार न थांबवता टोलची रक्कम आपोआप वजा केली जाईल.
नितीन गडकरी यांनी सांगितले की, नवीन तंत्रज्ञान हे पूर्णपणे AI (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) आधारित असेल. यामध्ये उपग्रहाच्या (Satellite) मदतीने वाहनांच्या नंबर प्लेटची ओळख पटवली जाईल. सध्या 'फास्टॅग'मुळे टोलचा वेळ 60 सेकंदांपर्यंत खाली आला असला, तरी नवीन एमएलएफएफ प्रणालीमुळे वाहने 80 किलोमीटर प्रति तास या वेगाने टोल नाका पार करू शकतील. कोणालाही थांबण्याची गरज पडणार नाही.
आर्थिक फायदे आणि पारदर्शकता यातून निर्माण होणार आहे. या नवीन प्रणालीमुळे दरवर्षी 1500 कोटी रुपयांच्या इंधनाची बचत होणार आहे. त्यामुळे सरकारी तिजोरीत 6000 कोटी रुपयांची अतिरिक्त भर पडेल. तसेच टोल चोरीचे प्रकार पूर्णपणे थांबतील. ही संपूर्ण यंत्रणा पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. अनेक वेळा टोल भरण्यासाठी लांबच लांब रागा लागतात. त्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींना समोरे जावे लागते. पण या नव्या प्रणाली मुळे हा त्रास वाचणार आहे.
अनेकदा राज्य महामार्ग किंवा शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचे फोटो सोशल मीडियावर राष्ट्रीय महामार्गाचे असल्याचे सांगून व्हायरल केले जातात. यावर स्पष्टीकरण देताना गडकरी म्हणाले की, केंद्र सरकार केवळ राष्ट्रीय महामार्गांसाठी जबाबदार आहे. ही नवीन टोल प्रणाली प्रवासाचा वेळ कमी करून प्रवास अधिक सुखकर करेल. प्रवास हा अधिक वेगवान होणार आहे. त्यामुळे वेळेची ही बचत होणार आहे. फार काळ आता टोल भरण्यासाठी टोल नाक्यावर थांबावे लागणार नाही असं ही गडकरी यांनी स्पष्ट केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world