संसदेचं अधिवेशन सुरु असतानाच विरोधी पक्षांमधील मतभेद उघड झाले आहेत. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात जनतेशी निगडीत मुद्यांवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचं तृणमूल काँग्रेसनं स्पष्ट केलंय. संसदेचं अधिवेशनात फक्त अदाणी समुहाच्या मुद्यावरच केंद्रीत राहू नये, असं मत पक्षानं व्यक्त केलंय. तृणमूल काँग्रेसच्या खासदार काकोली घोष दस्तीदार यांनी हे स्पष्ट केलंय. तृणमूल काँग्रेसची (TMC) ही भूमिका काँग्रेससाठी मोठा धक्का आहे. अदाणी समुहावरील आरोपांच्या नावावर संसदेचं अधिवेशन ठप्प करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
TMC चं काय ठरलं?
तृणमूल काँग्रेसनं संसदेच्या अधिवेशनात जनतेशी निगडीत मुद्यांवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचं स्पष्ट केलंय. मणिपूरमधील परिस्थिती, पश्चिम बंगालबरोबर केंद्रीतील योजनांमध्ये होणारा भेदभाव, अपराजिता विधेयकाला मान्यता या मुद्यांचा त्यामध्ये समावेश आहे. अपराजिता विधेयक बंगालच्या राज्यपालांनी राष्ट्रपतींकडं मंजुरीसाठी पाठवलं आहे. तृणमूल काँग्रेसच्या कार्यकरी समितीच्या बैठकीत संसदेच्या हिवाळी अधिवेशनातील रणनीती ठरवण्याबाबत चर्चा झाली. त्यानंतर या अधिवेशनात लोकांशी निगडीत मुद्दे मांडणार असल्याचं पक्षाच्या लोकसभेतील उपनेत्या काकोली घोष दस्तीदार यांनी सांगितलं.
( नक्की वाचा : भाजपाचा मुख्यमंत्री करण्यास शिंदे तयार, दिल्लीत दाखल होताच अजित पवारांचा खुलासा )
काँग्रेसला धक्का
काँग्रेस पक्षानं संसदेच्या दोन्ही सभागृहात अदाणींच्या मुद्यांवरुन कोणतंही काम होऊ दिलेलं नाही, त्याच वेळी ममता बॅनर्जी यांच्या पक्षाकडून हे वक्तव्य आलं आहे. संसदेचं कामकाज व्हावं, ही तृणमूल काँग्रेसची इच्छा आहे. फक्त एकाच मुद्यावर संसदेचं अधिवेशन ठप्प पडावं ही पक्षाची इच्छा नाही, असं दस्तीदार यांनी स्पष्ट केलं.
तृणमूल काँग्रेस विरोधी पक्षांच्या 'इंडी' आघाडीचा भाग आहे. पण, 'इंडी' आघाडीशी त्यांनी निवडणुकीत आघाडी केली नव्हती. आम्ही भाजपाचा सामना करणार आहोत.पण, भाजपाशी लढण्याची आमची पद्धत वेगळी असू शकते. कोणत्याही पक्षाशी निवडणूक आघाडी न करता आमचा पक्ष विजयी होत आहे, असं दस्तीदार यांनी स्पष्ट केलं.