Success Story: हिमाचल प्रदेशातील उना जिल्ह्यातील एका ट्रक चालकाच्या मुलीने मोठी कामगिरी केलीय. बसदेहरा येथील ट्रक ड्रायव्हर अमरिक सिंग यांची मुलगी सिमरनजीत कौरने न्यायिक सेवा परीक्षा उत्तीर्ण केली आहे. मुलगी न्यायाधीश झाल्याने सिंग कुटुंबीयांची मान अभिमानाने उंचावलीय. सिमरनजीत कौरने तिच्या यशाचे श्रेय वडील अमरिक सिंग आणि मामा इक्बाल सिंग यांना दिलंय. सिमरनजीत कौरने प्राथमिक शिक्षण मेहतपूर येथील डीएव्ही पब्लिक स्कूलमध्ये घेतलंय. यानंतर तिने पंजाब विद्यापीठातून एलएलबी आणि एलएलएमचे शिक्षण पूर्ण केले.
लेकीच्या शिक्षणासाठी वडिलांची मेहनत
आपल्या कुटुंबीयांचे पालनपोषण करण्यासाठी अमरिक सिंग कामाच्या निमित्ताने घराबाहेरच असतात. सिमरनजीतनेही त्यांचे कष्ट वाया जाऊ दिले नाही. स्वप्नं सत्यात उतरवण्यासाठी परिस्थिती नव्हे तर इच्छाशक्ती असणं आणि मेहनत घेणे महत्त्वाचे असते हे सिमरनजीतने सिद्ध केले. सिमरनजीतने दिवसभरात 15 तासांपेक्षा अधिक वेळ अभ्यास केला. या मेहनतीमुळेच सिंग कुटुंबीयांचे दिवस बदलणार आहेत.
आनंद देणारा निकाल
सिमरनजीत कौरने स्वतःच्या यशाबाबत प्रतिक्रिया दिली की, न्यायिक सेवेमध्ये सामील होण्याचे माझे ध्येय होते. माझे कर्तव्य मी प्रामाणिकपणे पार पाडेन. कोणतेही ध्येय साध्य करता येते, त्यासाठी कठोर मेहनत घेणे आवश्यक आहे. पुढे सिमरनजीत असंही म्हणाली की, ज्या दिवशी निकाल आला त्या दिवशी विश्वासच बसत नव्हता. निकालाबाबतची माहिती मला मित्रपरिवाराकडून समजली. यानंतर निकालाची पीडीएफ फाइल डाउनलोड केली, त्यावेळेस पूर्णपणे खात्री पटली.
मुलींना प्रगती करण्याची संधी द्यायला पाहिजे: सिमरनजीत
सिमरनजीतने असंही म्हटलं की, आपण मुलींना कमी लेखू नये. मुलींना प्रगती करण्याची संधी नक्कीच द्यायला पाहिजे. मुलगा आणि मुलगी असा भेद करू नये. यासाठी मला माझ्या वडिलांचा अभिमान आहे, जे नेहमीच माझ्या पाठीशी उभे राहिले. ट्रक ड्रायव्हर असूनही त्यांनी माझ्या शिक्षणात कोणतीही कसर सोडली नाही. शिक्षण हे माझे एकमेव ध्येय होते आणि शिक्षणाच्या जोरावरच इथंवर पोहोचलेय. हजारो विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली, पण केवळ 20 विद्यार्थीच उत्तीर्ण होऊ शकले, त्यापैकीही बहुतांश मुलींचा समावेश आहे.