भारत आणि पाकिस्तानमधील वाढता तणाव (India Pakistan Tension) निवळावा आणि दोन्ही देशांत शस्त्रसंधी व्हावी यासाठी आपणच शस्त्रसंधी घडवून आणली असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump) यांनी केला होता. आता त्यांनी या विधानावरून यु-टर्न घेतला आहे. विशेष बाब ही आहे की ट्रम्प यांनी केलेल्या दाव्याला भारताने कधीही दुजोरा दिला नव्हता. जर शस्त्रसंधी केली नाही तर तुमच्यासोबत आम्ही व्यापार करणार नाही अशी धमकी भारत आणि पाकिस्तानला दिल्याचेही ट्रम्प यांनी म्हटले होते. जर शस्त्रसंधी केलीत तर तुमच्यासोबत आम्ही भरपूर व्यापार करू असे आश्वासन दिले आणि दोन्ही देश लगेच तयार झाले असा ट्रम्प यांनी दावा केला होता. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने यासंदर्भात विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला नकारार्थी उत्तर दिले होते. भारत आणि अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांमध्ये तसेच इतर नेत्यांमध्ये चर्चा झाली. या चर्चेमध्ये व्यापाराचा मुद्दा कधीही आला नव्हता असे भारताने म्हटले आहे.
ट्रम्प यांनी गुरुवारी बोलताना म्हटले की, " मला हे म्हणायचे नाही की मी शस्त्रबंदी करवली मात्र मी भारत आणि पाकिस्तामधील समस्या सुटावी यासाठी मदत केली. दोन देशातील परिस्थिती चिघळत चालली होती. अचानक वेगळ्या पद्धतीची मिसाईल दिसू लागली. मी त्यांना म्हणालो की चला युद्धापेक्षा व्यापार करूया आणि दोन्ही देश त्यावर आनंदी झाले. हे देश 1000 पेक्षा जास्त वर्ष भांडतायत, मी म्हटले की मी कोणतीही गोष्ट सोडवू शकतो. परिस्थिती हाताबाहेर जाणार असं वाटत असताना वाद मिटल्याने सगळेजण आता खूश आहेत."
नक्की वाचा :तुर्कीचा पाकिस्तानला पाठिंबा महागात पडला; उदयपूरच्या मार्बल व्यापार्यांनी 5000 कोटींचे व्यवहार मोडले
12 मे रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून एक संबोधन केले होते. यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमधील शस्त्रसंधी व्यापारासाठीच्या संधीच्या आडून घडवून आणल्याचे सांगितले.त्यांनी म्हटले होते की "शनिवारी माझ्या प्रशासनाने भारत आणि पाकिस्तान या दोन अण्वस्त्रधारी देशांमध्ये संघर्ष वाढू नये यासाठी मध्यस्ती केली आणि तातडीने शस्त्रसंधी घडवून आणली. दोन देशांतील परिस्थिती चिघळणार असे वाटत होते. आम्ही बरीच मदत केली. आम्ही व्यापारासंदर्भातही मदत केली. मी म्हटले कमॉन आपल्याला बराच व्यापार करायचाय. आता थांबा, जर थांबला नाही तर आम्ही व्यापार करणार नाही. व्यापाराचा ज्या पद्धतीने मी वापरलाय तसा इतर कोणीही वापरलेला नाही. अचानक दोन्ही देश म्हणाले की आम्ही थांबतो, आणि ते थांबले. आम्ही दोन्ही देशांसोबत बराच व्यापार करणार आहोत. आम्ही भारतासोबत बोलणी करत आहोत, पाकिस्तानसोबतही करणार आहोत. आम्ही अणु युद्ध थांबवलंय ज्यामुळे लाखों लोकं दगावली असती. मला याचा अभिमान वाटतो."
पाकिस्तानने घाबरून केला फोन
7 मे पासून 10 मेपर्यंत भारताने पाकिस्तान अत्यंत भेदक प्रहार केला होता. दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानी सैन्याने भारतावर हल्ला करण्यास सुरुवात केली होती. यामुळे भारताने पाकिस्तानच्या हवाई दलाचे 9 एअरबेस उद्ध्वस्त केले होते. या हल्ल्यांमुळे पाकिस्तानी सैन्य जबरदस्त टरकलं होतं. अखेर 10 मे रोजी पाकिस्तानी डीजीएमओंनी भारताच्या डीजीएमओंना फोन केला आणि शस्त्रसंधीचा प्रस्ताव मांडला. या शस्त्रसंधीसाठी कोणीही मध्यस्थी केली नव्हती असे भारताने अनेकदा सांगितले होते. पाकिस्तानकडूनच यासाठी फोन आला होता असेही भारताने सांगितले होते. ट्रम्प यांच्या विधानांनी मात्र मोठा गोंधळ उडवून दिला होता. यावरून भारतामध्येही राजकारण सुरू झाल्याचे पाहायाला मिळाले होते.