Twisha Sharma Case: लखलखते दिवे, डीजेचा दणदणाट आणि लग्नाच्या मांडवात आनंदाने नाचणारी एक सुंदर नववधू... तिचे हसणे, तिचे बागडणे पाहून कोणालाही वाटले असते की ही जगातील सर्वात आनंदी मुलगी आहे. पण नियतीचा खेळ इतका क्रूर असेल, याची कल्पना कोणालाही नव्हती. लग्नानंतर अवघ्या 5 महिन्यांच्या आत त्या हसऱ्या चेहऱ्याचा करुण अंत झाला. आज हीच वधू टीव्हीच्या पडद्यावर आणि वृत्तपत्रांच्या पानांवर एका 'मिस्ट्री'च्या रूपात समोर येत आहे.
माजी मिस पुणे आणि एमबीए पदवीधर असलेल्या ट्विशा शर्माचा मृत्यू आता एका मोठ्या वादाचे केंद्र बनला आहे.
डेटिंग ॲपवर सुरू झाली आणि स्मशानात संपली लव्ह स्टोरी
ट्विशा शर्मा आणि समर्थ सिंह यांची भेट एका डेटिंग ॲपवर झाली होती. सुशिक्षित आणि महत्त्वाकांक्षी असलेल्या ट्विशाने एका वकिलाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. तिची सासू चक्क एक निवृत्त न्यायाधीश आहे. एका सुशिक्षित, उच्चभ्रू कुटुंबात एका 'मिस पुणे'चा असा अंत होईल, हे कोणाच्याही कल्पनेपलीकडचे होते. लग्नाच्या व्हिडिओमध्ये आनंदाने थिरकणारी ट्विशा अवघ्या 150 दिवसांत या जगातून का निघून गेली, हा प्रश्न आता देशाला पडला आहे.
( नक्की वाचा : Pune News: ज्याच्यावर विश्वास टाकला, त्यानेच माऊलींचा खजिना लुटला; आळंदी हादरली! )
हनिमूनच्या प्रवासापासूनच छळाचा 'ट्रेलर'
ट्विशाच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतर काही दिवसांतच समर्थचे खरे रूप समोर येऊ लागले होते. व्हिएतनामला हनिमूनला जाताना विमानाची वेळ चुकल्याने समर्थने विमानतळावरच सर्वांसमोर तिला ढकलले होते. "सुरुवातीला आम्हाला वाटले की हा फक्त स्वभावाचा दोष आहे, पण आम्ही चुकलो होतो," असे तिचे वडील नव्वानिधी शर्मा यांनी सांगितले. लग्नाच्या वेळी दिलेली आश्वासने हवेत विरली आणि त्विशाच्या नशिबी फक्त अपमान आला.
सासूवर गंभीर आरोप
या प्रकरणात ट्विशाची सासू आणि निवृत्त न्यायाधीश गिरिबाला सिंह यांच्यावर गंभीर आरोप होत आहेत. "त्यांचा स्वभाव हुकूमशहासारखा होता. त्या पेशाने न्यायाधीश असल्याने आम्ही त्यांच्या धाकदपटशाच्या स्वभावाकडे दुर्लक्ष केले," असे पालकांनी म्हटले आहे. दरम्यान, सासूने सर्व आरोप फेटाळून लावत ट्विशाच्या मानसिक आरोग्यावर आणि चारित्र्यावरच प्रश्न उपस्थित केले आहेत. इतकेच नाही तर, ट्विशाच्या बाळाच्या वैधतेवरही शंका घेतल्याचे काही चॅट्समधून समोर येत आहे.
( नक्की वाचा : NEET Paper Leak : पुण्यातील प्रसिद्ध कॉलेजच्या प्राचार्याला बेड्या! 'नीट' च्या परीक्षेत असा झाला पेपरचा सौदा )
हुंडा आणि छळाचे नवनवीन प्रकार
शिक्षित कुटुंबात आता कोणी थेट हुंडा मागत नाही, पण भेटवस्तू आणि विधींच्या नावाखाली दबाव टाकला जातो. ट्विशाच्या वडिलांच्या कंपनीतील शेअर्स आपल्या नावावर करून घेण्यासाठी सासरच्या मंडळींनी दबाव टाकल्याचा गंभीर आरोप आहे. तिला मानसिक आणि शारीरिक छळाच्या खाईत ढकलले गेल्याचे तिचे वडील सांगतात.
मृत्यूच्या काही तास आधीचा तो शेवटचा कॉल
ट्विशा हळूहळू लोकांपासून दूर जाऊ लागली होती. मृत्यूच्या काही वेळ आधी तिने तिच्या कुटुंबीयांना फोन केला होता. "मी फसले आहे (फस गयी हूँ)," असे शब्द तिने वापरले होते. तिचे वडील तिला घरी न्यायला येणार होते, पण तितक्यात समर्थचा आवाज आला आणि फोन कट झाला. त्यानंतर थेट तिच्या मृत्यूचीच बातमी समोर आली.
आता या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. एकीकडे सासरच्यांकडून तिची बदनामी सुरू आहे, तर दुसरीकडे एक हतबल वडील त्यांच्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून न्यायासाठी लढत आहेत.