भारताचं नंदनवन समजलं जाणारं जम्मू काश्मीर हे नेहमीच पर्यटकांना खुणावत असतं. काश्मीरमधील हिमालयाची शिखरं पर्यटकांना साद घालतात. पण, काश्मीर खोऱ्यातील अशांत परिस्थितीमुळे पर्यटक तसंच ट्रेकर्सना अनेकदा अडचणी सहन कराव्या लागतात. जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांच्या चकमकीमध्ये 2 पर्यटक सापडले होते. पण, त्यांचं प्रसंगावधान आणि सुरक्षा दलाची तत्परता यामुळे त्यांचा जीव वाचला.
नेमकं काय घडलं?
पोलीस आणि सुरक्षा दलानं जम्मू काश्मीरमधील झबरवान जंगलात लपलेल्या दहशतवाद्यांना शोधण्यासाठी शनिवारी सर्च ऑपरेशन सुरु केलं होतं. त्यावेळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये सुरु असलेल्या गोळीबाराच्या दरम्यान दोन पर्यटक अडकले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.
हे दोन्ही पर्यटक धोकादायक जागेवर होते. ते एका दगडाच्या मागे लपले. त्यापैकी एकानं 100 नंबर डायल करुन पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर सुरक्षा दलानं काही काळ त्यांचं ऑपरेशन स्थगित केलं आणि त्यांची सुटका केली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
( नक्की वाचा : Vote Jihad : 'व्होट जिहाद'च्या आरोपांना उत्तर देताना ओवैसींना आठवले पूर्वज, म्हणाले... )
ट्रेकर्सना सूचना
या सर्व प्रकरणाानंतर काश्मीर पोलिसांनी ट्रेकर्सना त्यांच्या मार्गाची पूर्व कल्पना पोलिसांना द्यावी अशी ट्रेकर्सना सूचना केली आहे. गिर्यारोहक तसंच धाडशी मोहीम करणाऱ्या व्यक्तींनी त्यांच्या कार्यक्रमाची पूर्वकल्पना जवळच्या पोलीस स्टेशनला द्यावी. त्यामुळे एखादा अनपेक्षित प्रसंग उद्भवला तर त्यांना घटनास्थळावरुन सुखरुप बाहेर काढणे सोपे होईल, अशी सूचना काश्मीरचे पोलीस प्रमुख विधी कुमार यांनी केली.
झबरबान जंगलात अडकलेल्या दोन गिर्यारोहकापैकी एकाला सुदैवानं 100 नंबरवर फोन करणे सुचले. नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरील सुरक्षा अधिकाऱ्यांनी योग्य माहिती दिली. त्यांच्यामधील समन्वयामुळेच या गिर्यारोहकांचा जीव वाचला, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
स्थानिक, पर्यटक आणि विशेषत: गिर्यारोहकांनी हेल्पलाईनचा वापर करावा. त्यांनी थेट 100 नंबरवर फोन करावा किंवा थेट पोलीस स्टेशनला संपर्क साधावा, अशी सूचना पोलीस अधिकाऱ्यानं दिली.