UGC NET Admit Card 2024 : यूजीसी नेट परीक्षा 18 जून रोजी होणार आहे. मात्र आतापर्यंत एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेने, नेट जून 2024 (NET June 2024) साठी विद्यार्थ्यांना अॅडमिट कार्ड जारी केलेली नाहीत. युजीसी नेट परीक्षा देशभरातील 500 हून अधिक परीक्षा केंद्रांवर घेतली जाणार आहे. या परीक्षेला अवघे 4 दिवस उरले आहेत. मात्र तरीही परीक्षार्थींना अॅडमिट कार्ड मिळालेलं नाही. हे कार्ड अजून न मिळाल्याने विद्यार्थ्यांचे टेन्शन वाढले आहे. भयंकर उकाडा असल्याने आपल्या पसंतीचे जवळचे केंद्र मिळाले नाही, त्याऐवजी लांबचे आणि गैरसोयीचे केंद्र मिळाले तर काय करायचे असा प्रश्न या विद्यार्थ्यांना सतावत आहे. केंद्र दुसऱ्या शहरात किंवा जिल्ह्यात असेल तर तिथे वेळेवर कसं पोहोचणार असाही प्रश्न विद्यार्थ्यांना सतावतोय. सध्या बहुसंख्य शाळांना उन्हाळ्याची सुट्टी लागलेली आहे. या काळात अनेकजण बाहेर फिरायला निघालेले असल्याने रेल्वेचे आरक्षण मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे एका शहरातून दुसऱ्या शहरात जाणे हे मुश्कील झाले आहे.
पेपर कसा देणार? विद्यार्थ्यांना चिंता
एनटीएकडून एक-दोन दिवसात कार्ड मिळालं नाही तर अनेक विद्यार्थी परीक्षा देऊ शकणार नाही. गेल्या वर्षी देखील हे कार्ड मिळण्यास उशीर झाला होता, ज्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागले असते. कारण या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र दुसऱ्या शहरातील आले होते आणि तिथपर्यंत वेळेत पोहोचणे या विद्यार्थ्यांना शक्य नव्हते.
परीक्षा केंद्र शोधण्याची कसरत
यूजीसी नेट 2024 परीक्षेसाठीचे अॅडमिट कार्ड उशिरा मिळत असल्याने अनेक विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावरून आपली नाराजी व्यक्त करणे सुरू केले आहे. JRF ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी म्हटले आहे की काही विद्यार्थ्यांना एक दिवस आदी परीक्षा केंद्राबाबतची माहिती मिळाली. भलेही त्या शहराची त्या विद्यार्थ्याला माहिती असली तरी ते केंद्र शोधणे हे विद्यार्थ्यांना अवघड जाते. परीक्षेपेक्षा, केंद्र शोधण्याचे विद्यार्थ्यांना जास्त टेन्शन येते.
असिस्टंट प्रोफेसर आणि जेआरएफसाठीची परीक्षा
एनटीए तर्फे 7 जून रोजी यूजीसी नेट 2024 परीक्षेसाठीच्या सिटी स्लीप जारी केल्या होत्या. विद्यापीठांमध्ये ‘सहायक प्रोफेसर' सोबतच ‘ज्युनियर रिसर्च फेलोशिप ' साठीची पात्रता निश्चित करण्यासाठी ही परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा वर्षातून दोनवेळा घेतली जाते.