Unique Buffalo Birthday: हौसेला काही मोल नसतं म्हणतात ते खरं आहे. काही लोक एखाद्या प्राण्यावर माणसा प्रमाणे प्रेम करतात. त्यासाठी ते काही करायला तयार असतात. त्याचाच एक प्रत्यय समोर आला आहे. एका व्यक्तीने आपल्या म्हशीचा जबराट बर्थडे साजरा केला. या बर्थडेत लाखोचा खर्च होता. जेवणावळ होती. डीजे होता. गावकऱ्यांनी तर या बर्थडेमध्ये एकच धमाल केली. या अनोख्या बर्थडेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा बर्थडे उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील सुनगढ गावात झाला. या गावातल्या म्हशीचा वाढदिवस ज्या पद्धतीने साजरा झाला, तो पाहून संपूर्ण परिसर अवाक झाला आहे. लहान मुले, मोठे लोक किंवा सेलिब्रिटी यांचे वाढदिवस आपण नेहमीच पाहतो, पण म्हशीचा वाढदिवस इतक्या थाटामाटात साजरा होण्याची ही एक अनोखी घटना आहे. या बर्थडे मध्ये संपूर्ण गाव सहभागी झाला होता. एखाद्या व्यक्तीच्या बर्थडे ला लाजवेल असा हा बर्थ डे साजरा करण्यात आला.
या म्हशीच्या मालकाने म्हशीला फुलांच्या आणि नोटांच्या माळा घातल्या. त्यानंतर डीजेच्या तालावर नाचत संपूर्ण गावात तिची मिरवणूक काढण्यात आली. गावकरी आनंदाने नाचले, लहान मुलांनी फोटो काढले आणि महिलांनी मिठाई वाटली. म्हशीसाठी केक कापण्यात आला. शेकडो लोकांना जेवण देण्यात आले. या संपूर्ण सोहळ्यावर लाखो रुपये खर्च झाल्याचे सांगितले जात आहे. या म्हशीचा मालक हा गावातला दानशूर म्हणून ही ओळखला जातो. त्याच्या नावा प्रमाणेच त्याने आपल्या म्हशीचा बर्थडे ही करून दाखवला.
या म्हशीचं नाव'शेरा' आहे. शेराचा मालक इसरार याने सांगितले की, "शेरा आमच्या कुटुंबाचा सदस्य आहे. तिच्या पहिल्या वाढदिवसालाही पार्टी आयोजित केली होती. यावेळी आणखी मोठा सोहळा आयोजित केला. अशा आयोजनांमुळे गावात बंधुभाव आणि आनंद वाढतो, असे त्यांचे म्हणणे आहे. या आयोजनाचा व्हिडिओ 'Jabalpur Say' नावाच्या अकाउंटवरून इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. जो आता व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर मात्र यावर गंमतीदार चर्चा सुरू आहेत. काहींच्या मते हा 'लोकप्रियता मिळवण्याचा स्टंट' असून मालक सरपंच निवडणुकीची तयारी करत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.