हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यातील शिलाई गावात नुकत्याच झालेल्या एका अनोख्या विवाहसोहळ्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. इथे एका वधूने दोन सख्ख्या भावांशी लग्न केलं आहे. शिलाई गावातील प्रदीप नेगी आणि कपिल नेगी यांनी जवळच्या कुन्हाट गावातील सुनीता चौहान या तरुणीशी एकाच वेळी लग्न केले. हा विवाह सोहळा पूर्ण सहमतीने आणि सामुदायिक सहभागासह पार पडला. हा सोहळा हाटी समुदायाच्या बहुपत्नी (Polyandry) परंपरेवर आधारित होता. यात एकच तरुणी दोन किंवा अधिक भावांबरोबर लग्न करते.
प्रदीप नेगी हा जलशक्ती विभागात कार्यरत आहे. त्याा धाकटा भाऊ कपिल नेगी हा परदेशात हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात काम करतो. हे दोघे ही उच्च शिक्षित आहेत. दोघांची दिनचर्या आणि देश वेगवेगळे असले तरी, दोन्ही भावांनी एकत्र येऊन ही परंपरा पाळण्याचा निर्णय घेतला. हा आमचा संयुक्त निर्णय होता. हे विश्वास, काळजी आणि सामायिक जबाबदारीचे नाते आहे. आम्ही ही परंपरा उघडपणे स्वीकारली आहे. कारण आम्हाला आमच्या परंपरांवर गर्व आहे. असं प्रदीय याने लग्नानंतर सांगितलं. तर कपिल म्हणाला की, मी जरी परदेशात असलो तरी, या विवाहाच्या माध्यमातून आम्ही दोघे ही आमच्या पत्नीला स्थिरता, समर्थन आणि प्रेम देण्यासाठी कटिबद्ध आहोत असं त्याने स्पष्ट केलं.
या दोघांशी लग्न करणाऱ्या सुनीताने ही आपली प्रतिक्रीया दिली आहे. ती म्हणाली हा माझा स्वतःचा निर्णय होता. माझ्यावर कोणतेही दडपण नव्हते. मला ही परंपरा माहीत आहे. मी ती माझ्या इच्छेने स्वीकारली आहे. असं ती म्हणाली. या अनोख्या विवाहसोहळ्यात शेकडो गावकरी आणि नातेवाईक सहभागी झाले होते. तीन दिवस चाललेल्या या विवाह समारंभात पारंपरिक 'ट्रान्स-गिरी' पदार्थ वाढण्यात आले होते. पहाडी लोकगीतांवर या लग्नात जल्लोष करण्यात आला.
स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की, आमच्या गावातच तीन डझनांहून अधिक कुटुंबांमध्ये दोन किंवा तीन भावांना एकच पत्नी असते. पण अशी लग्ने सहसा शांतपणे होतात. हे लग्न प्रामाणिकपणाने आणि सन्मानाने सार्वजनिकरित्या साजरे झाले, त्यामुळे ते खास बनले आहे असं ही ते सांगतात. ट्रान्स-गिरी प्रदेशात बहुपत्नीत्वाची (Polyandry) परंपरा अनेक व्यावहारिक कारणांमुळे जन्माला आली आहे. पूर्वजांच्या जमिनीचे विभाजन रोखणे, महिलांना विधवा होण्यापासून वाचवणे आणि कुटुंबात एकता टिकवून ठेवणे. या मुळे ही परंपरा जन्माला आली आहे.