
एका कॅमेरानं केला घात आणि जगासमोर आली लफड्याची बात असं म्हणण्याची वेळ आली आहे. बॉस आणि एचआरचं अफेअर या माध्यमातून समोर आले. शिवाय याअफेअरमुळे सोशल मीडिया ही सैराट झाला. सध्या काही दृश्यं सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. तुम्ही तुमच्या बायकोला किंवा नवऱ्याला न सांगता एखाद्या कॉन्सर्टला जाता.ऑफिसमधल्या तुमच्या मैत्रिणीला सोबत नेता. मस्त रोमॅन्टिक मूडमध्ये तुम्ही कॉन्सर्ट एन्जॉय करत असता. आणि त्याचवेळी एक कॅमेरा तुमच्यावर फिरवला जातो. तुम्ही रोमान्स करताना मोठ्या स्क्रीनवर दिसता. अख्खं जग तुम्हाला त्या मोठ्या स्क्रीनवर पाहातं. आणि तुमचं लफडं जगासमोर येतं. अशीच एक घटना आता समोर आली आहे.
Astronomer कंपनीचे सीईओ अँडी बायरन आणि कंपनीची एचआर हेड क्रिस्टीन कोबोट हेच ते दोघे. ज्यांची चोरी पकडली गेली आहे. अमेरिकेतल्या बोस्टनमध्ये कोल्ड़ प्ले कॉन्सर्ट सुरू होता. अँडी आणि क्रिस्टीन दोघेही या कॉन्सर्टला गेले होते. एकदम भारी माहोल होता. कॉन्सर्ट एकदम रंगात आला होता. अँडी आणि क्रिस्टीनचा मस्त रोमान्स सुरू होता. तेवढ्यात कोल्ड प्लेमधला किस कॅमेरा अँडी आणि क्रिस्टीनवर आला.आणि कॉन्सर्टमधल्या मोठ्या स्क्रीनवर दोघे दिसले. आपली चोरी पकडली गेली हे दोघांनाही कळताच दोघेही दचकले. क्रिस्टीननं दोन्ही हातांनी चेहरा लपवला. तर अँडी तोंड लपवत थेट खालीच बसला. कॉन्सर्टमधला किस कॅमेरा आपलं बिंग फोडेल असं या दोघांनाही स्वप्नातही वाटलं नसेल. नेमकं तेच घडलं.

कोल्ड प्ले कॉन्सर्टमधला हा किस कॅमेरा कायम अशी रोमँटिक मूडमध्ये असलेली जोडपी शोधत असतो. कधी कधी तर या किस कॅमेरावर लग्नासाठी एकमेकांना प्रपोजही केलं जातं. अमेरिकेत कॉन्सर्ट, बास्केटबॉल, बेसबॉल मॅचेसमध्ये हे किसकॅम सर्रास वापरले जातात. पण या कॉन्सर्टमध्ये किस कॅमेरानं अँडी आणि क्रिस्टीनचं अफेअर जगासमोर आणलं. अँडी आणि क्रिस्टीन दोघांचंही लग्न झालंय. अँडीला दोन मुलं आहेत. कॅमेरा दोघांवर जाताच, ज्या पद्धतीनं दोघांनी आपापलं तोंड लपवलं ते पाहता दोघेही आपापल्या जोडीदाराला न सांगता कॉन्सर्टला आले होते, हे अगदीच उघड आहे. अँडीचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर त्याची बायको मेगन केरिगननं सोशल मीडियावर तिची प्रोफाईल अपडेट केली. तिने बायरन हे आडनाव पुसून टाकलं आहे.
अँडी आणि क्रिस्टीन ज्या कंपनीमध्ये आहेत ती अॅस्ट्रॉनॉमर कंपनी ही जगातली प्रसिद्ध टेक कंपनी आहे. अँडी बायरन हा अॅस्ट्रॉनॉमरचा सीईओ आहे. जुलै 2023 पासून अँडी या पदावर आहे. याआधी त्यानं नामांकित कंपन्यांमध्ये महत्त्वाची पदं भूषवली आहेत. तर क्रिस्टिन कोबोट एचआर हेड म्हणून नोव्हेंबर 2024 मध्ये या कंपनीमध्ये रुजू झाली. त्यावेळीही बायरननं क्रिस्टीनचं कौतुक करत तिचं कंपनीमध्ये स्वागत केलं होतं. गेले आठ महिने बायरन आणि क्रिस्टीनचे विवाहबाह्य संबंध असल्याची चर्चा आता कंपनीमध्ये सुरू झालीय. अँडी आणि क्रिस्टीन यांचं अफेअर जगासमोर येणं, एवढंच या सगळ्या प्रकरणात घडलं नाही. तर यानिमित्तानं नाती, ऑफिसमधले संबंध आणि वर्क कल्चरची गरमागरम चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे.
लोक धोका का देतात ? तुमच्या नवऱ्याचा किंवा बायकोचा विश्वासघात करु नका. तुमच्या नवऱ्याला किंवा बायकोला न सांगता तुम्ही दुसऱ्याच व्यक्तीबरोबर असा रोमान्स कसा करू शकता अशा प्रतिक्रिया नात्यांच्या संदर्भात सोशल मीडियावर व्यक्त केल्या जात आहेत. तर एचआर आणि बॉसचेच विवाहबाह्य संबंध असतील तर बॉसची तक्रार करायची कुणाकडे, असा प्रश्नही काही जणांनी विचारला आहे. गेल्या काही काळापासून नामांकित कंपन्यांच्या सीईओवर कंपन्यांचं विशेष लक्ष असतं. नामांकित कंपन्यांमधल्या मोठ्या पदावरच्या व्यक्तींनी अत्यंत सावध राहावं आणि कुठल्याही आमिषांना भुलू नये, कुठल्याही मोहात पडू अशी अपेक्षा असते. नामांकित कंपन्यांचे सीईओ कसे वागतात, त्यावर त्या कंपनीची प्रतिमा, कंपनीचा व्यवसाय, कंपनीची आर्थिक प्रगती आणि कंपनीचे शेअर्सही अवलंबून असतात असं ही काहींनी म्हटलं आहे.
नक्की वाचा - Pune News: सह्याद्री हॉस्पिटल उभारणाऱ्या चारुदत्त आपटेंची खळबळजनक ऑडियो क्लिप
अँडी बायरन आणि क्रिस्टीन कोबोटचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर अॅस्ट्रॉनॉमर कंपनीनं ताबडतोब या प्रकरणाची चौकशी करण्याची घोषणा केलीय. तर कंपनीतल्या ज्या कर्मचाऱ्यानं या दोघांना तिकीटं काढून दिली, त्यालाही नोकरीवरुन काढून टाकण्यात आलंय. तर अँडी आणि क्रिस्टीनला सक्तीच्या रजेवर पाठवलंय. अँडीच्या जागी दुसऱ्या अधिकाऱ्याला सीईओ करण्यात आलंय. त्या मोहाच्या एका क्षणामुळे अँडी आणि क्रिस्टीनची नोकरी धोक्यात आलीय, घरामध्येही वादळ निर्माण झालंय आणि नात्यांचा खेळखंडोबा झालाय.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world