UPSC Result 2025: युपीएससी म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा ही भारतातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. दरवर्षी लाखो तरुण या परीक्षेसाठी दिवसरात्र एक करतात, पण यश मात्र मोजक्याच हातांना गवसते. या परीक्षेचा आवाका, अफाट अभ्यासक्रम आणि मुलाखतीचा टप्पा पार करणं म्हणजे कोणत्याही विद्यार्थ्यासाठी अग्निपरीक्षाच असते. अशा या आव्हानात्मक परीक्षेत देशभरातून पहिल्या 10 मध्ये येणं हे कोणत्याही कुटुंबासाठी अभिमानास्पद स्वप्न असतं, पण एका वडिलांच्या बाबतीत मात्र चित्र काहीसं वेगळं आहे.
दहावा रँक मिळवूनही वडील नाराज
देशातील सर्वात कठीण अशा युपीएससी 2025 परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि सगळीकडे आनंदाला उधाण आलं. बिहारमधील वैशाली जिल्ह्याच्या बिदुपूर गावातील उज्ज्वल प्रियांक या तरुणानं या परीक्षेत ऑल इंडिया लेव्हलवर 10 वा रँक मिळवून ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
संपूर्ण जिल्ह्यात सध्या मिठाई वाटली जात आहे आणि उज्ज्वलचं कौतुक होत आहे. मात्र, इतकं मोठं यश मिळवूनही त्याचे वडील संजीव कुमार हे पूर्णपणे आनंदी नाहीत. आपल्या मुलानं देशात पहिला क्रमांक का पटकावला नाही, हा प्रश्न त्यांना सतावत आहे.
( नक्की वाचा : UPSC Exam 2025 : यूपीएससी परीक्षेत महाराष्ट्राची भरारी, 60 पेक्षा जास्त उमेदवार बनले अधिकारी,वाचा संपूर्ण यादी )
उज्ज्वलचा आतापर्यंतचा शैक्षणिक प्रवास
उज्ज्वल हा लहानपणापासूनच अभ्यासात अत्यंत हुशार आहे. त्याच्या शैक्षणिक रेकॉर्डवर नजर टाकली तर तो नेहमीच अव्वल राहिला आहे. दहावीच्या परीक्षेत त्याला 10 CGPA मिळाले होते, तर बारावीत त्यानं 96 टक्के गुण मिळवून यश संपादन केलं होतं. तो जिथे शिकला तिथे त्यानं नेहमीच पहिलं स्थान मिळवलं आहे.
युपीएससीमध्ये हा त्याचा तिसरा प्रयत्न होता आणि यावेळी त्यानं थेट टॉप 10 मध्ये मजल मारली. तरीही त्याच्या वडिलांना अपेक्षित असलेलं 'नंबर वन'चं स्थान हुकल्यानं त्यांच्या मनात काहीशी नाराजी आहे.
( नक्की वाचा : UPSC CSE 2025 : अपघातात स्मृती गेली,पायही गमावले; 10 वर्षांनंतर नियतीला हरवून जिद्दी मुलगी झाली सरकारी अधिकारी )
यशाचा मार्ग रोखणारे ग्रह आणि नक्षत्र
उज्ज्वलचे वडील स्वतः एक इंजिनिअर आहेत, पण मुलाच्या यशात आलेल्या या 'कमी'साठी ते नशिबाला आणि ग्रहांच्या स्थितीला जबाबदार धरत आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उज्ज्वल जेव्हापासून नागरी सेवेची तयारी करत होता, तेव्हापासून ते स्वतः ज्योतिषाचा अभ्यास करत होते.
2023 पासून त्यांनी या विषयाचा सखोल अभ्यास सुरू केला. मुलाच्या कुंडलीत गुरु ग्रहाची स्थिती दोषपूर्ण असल्याचं त्यांना आढळलं होतं. हे दोष दूर करण्यासाठी त्यांनी अनेक अनुष्ठानं आणि पूजापाठही केले होते.
वडिलांची नेमकी खंत काय
संजीव कुमार यांनी यावेळी बोलताना सांगितलं की, उज्ज्वल किमान आयएएस होईल याची आम्हाला खात्री होतीच, पण तो देशात पहिला येईल अशी आमची इच्छा होती. तो ज्या ज्या परीक्षेत बसला तिथे त्यानं टॉप केलं, मग इथेच तो मागे कसा राहिला? त्यांच्या मते, त्यांच्या स्वतःच्या ग्रहांच्या दोषामुळे मुलाच्या पहिल्या रँकमध्ये अडथळा निर्माण झाला. मुलाला मिळालेल्या 10 व्या रँकवर समाधान मानण्याऐवजी, तो पहिल्या क्रमांकावर का नाही, याचं उत्तर ते आता ग्रह-ताऱ्यांच्या गणितात शोधत आहेत.