Success Story : UPSC देशातील अवघड परीक्षांमधील एक मानली जाते. दरवर्षी लाखो उमेदवार परीक्षा देतात. धैर्य, व्यासंग आणि सातत्य असेल तिच व्यक्ती परीक्षा पास होतात. आज आपण अशा एका उमेदवाराबद्दल बोलणार आहोत, जी तीन वेळा अयशस्वी झाली. मात्र तरीही तिने हार मानली नाही आणि मेहनत सुरू ठेवली, अखेर ती आयएफएस अधिकारी बनली. आज आपण २०१८ मध्ये AIR ११ वा क्रमांक मिळवणाऱ्या पूज्य प्रियदर्शिनीबद्दल बोलणार आहोत.
पहिल्या प्रयत्नात अपयशी...
पूज्य प्रियदर्शिनी यांनी २०१३ मध्ये पदवीपर्यंतच शिक्षण पूर्ण केलं. यानंतर त्यांनी पहिल्यांदा युपीएससीची परीक्षा दिली. पहिल्या प्रयत्नात त्यांना यश मिळू शकलं नाही. मात्र त्यांनी हार मानली नाही आणि पुन्हा तयारी सुरू केली.
दिल्ली ते न्यूयॉर्क आणि पुन्हा युपीएससीचं स्वप्न...
दिल्ली विद्यापीठातून बीकॉमपर्यंतच शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्या न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठात गेल्या. येथे त्यांनी प्रशासन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं. यादरम्यान त्यांनी नोकरीसह युपीएससीची तयारी सुरू केली. पदव्युत्तर अभ्यास, नोकरी आणि युपीएससीची तयारी अशा तिन्ही गोष्टी त्या एकाच वेळेस करीत होत्या. प्रियदर्शिनी दिवसा नोकरी करीत होत्या, रात्री अभ्यास आणि युपीएससीच्या तयारीसाठी नोट्स तयार करीत होत्या.
बऱ्याचदा पाहिलं जातं, सरकारी नोकरीच्या तयारीसाठी अनेकजण हातातील नोकरी सोडून देतात. मात्र पूज्य यांनी वेगळा आणि खडतर मार्ग निवडला. मर्यादित वेळेत अभ्यास पूर्ण करून, त्यांनी शिस्त, वेळेचे व्यवस्थापन आणि स्वनियंत्रण दाखवलं, जे स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी खूप महत्वाचं असतं.
आई-वडिलांचा पाठिंबा, रणनीतीत बदल...
२०१६ मध्ये पूज्य प्रियदर्शिनी यांना यश मिळवता आलं नाही. २०१७ मध्ये त्यांना प्रारंभिक परीक्षाही पास करता आली नाही. ज्यानंतर त्या खचल्या होत्या. त्यांनी युपीएससीची तयारी सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र यादरम्यान कुटुंबाने त्यांना साथ दिली. प्रियदर्शिनीचे पालकही नागरी सेवांशी संबंधित होते, त्यामुळे त्यांना यूपीएससीचे स्वरूप माहित होते.
पूज्य यांनी पुन्हा अभ्यासाला सुरुवात केली आणि आपल्या अभ्यासाच्या रणनीतीवर गहन विचार केला आणि त्यात बदलही केला. त्यांनी कमकुवत विषयांवर लक्ष केंद्रित केलं आणि त्याच्या तयारीची रणनीती आखली. ही बदललेली रणनीती त्यांच्या प्रवासात एक महत्त्वाचा टप्पा ठरला.
२०१८ मध्ये यश, मग IFS ची निवड का केली?
प्रियदर्शिनी यांच्या मेहनतीला २०१८ मध्ये फळ मिळालं. त्यांना AIR मध्ये ११ वी रँक मिळाली. पूज्य यांना चांगली रँक मिळाली होती. त्यांना प्रशासकीय सेवा निवडण्याचा पर्याय होता. मात्र तरीही त्यांनी भारतीय परराष्ट्र सेवेची निवड केली. त्यांचा कल आंतरराष्ट्रीय संबंधात होता. त्यासाठी त्यांनी IFS ची निवड केली.