अमेरिकेतील विशेष सरकारी वकील ब्रेऑन पीस यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. 10 जानेवारीला ते राजीनामा देणार आहेत. याच पीस यांनी अदाणी ग्रीन एनर्जी आणि त्यांच्या अधिकाऱ्यांवर लाचखोरीचा आरोप लावला होता. पीस यांची नियुक्ती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी केली होती. पीस यांनी राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर करताना म्हटले आहे की, डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वीच ते कामकाजातून बाहेर पडणार आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोण आहेत ब्रायन पीस ?
पीस हे मूळचे न्यूयॉर्कच्या ब्रुकलीनचे रहिवासी आहेत. 53 वर्षांच्या पीस यांनी बुधवारी एक निवेदन जारी करत राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले. विशेष सरकारी वकील म्हणून काम करताना आलेला अनुभव हा अविस्मरणीय होता अशी प्रतिक्रिया पीस यांनी दिली आहे. पीस यांची नियुक्ती 2021 साली जो बायडेन यांनी केली होती. अमेरिकेत नुकतीच राष्ट्राध्यक्षपदासाठीची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. 20 जानेवारी 2025 रोजी ते कार्यभार सांभाळणार आहेत. त्यापूर्वीच कामकाजातून बाहेर पडण्याचा ब्रायन पीस यांनी निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांनी पीस यांच्याजागी कॅरोलीन पोकॉर्नी यांची निवड केली आहे. ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर पोकॉर्नीदेखील पदभार स्वीकारतील.
नक्की वाचा : अदाणी समूहाचा मोठा विजय, कंत्राटावर आक्षेप घेणारी याचिका हायकोर्टाने फेटाळली
आरोप खोटे, बिनबुडाचे- अदाणी समूह
अदाणी समूहाविरोधात ब्रायन पीस यांनी आरोप केले होते. या आरोपांचे अदाणी ग्रीन एनर्जीने खंडण केले होते. गौतम अदाणी, सागर अदाणी आणि वरिष्ठ संचालक विनीत जैन यांच्यावर कोणताही आरोप नसल्याचे कंपनीने स्पष्टीकरण दिले होते. अदाणी ग्रीन एनर्जीने आपल्या निवेदनात म्हटले होते की, लाचखोरीचे आरोप हे 'अझूर पॉवर'चे रणजित गुप्ता, सिरील कँबंस, सौरभ अग्रवाल, दीपक मल्होत्रा आणि रुपेश अग्रवाल तसेच सीडीपीक्यू नावाच्या कंपनीविरोधात करण्यात आले असल्याचेही अदाणी ग्रीन एनर्जीने म्हटले होते. अदाणी समूहातील कोणाचेही यात नाव नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले होते.