Crime News : उत्तर प्रदेशातील लखनऊजवळील आंबेडकर नगर जिल्ह्यातून वैद्यकीय हलगर्जीपणाचा एक अत्यंत भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. एका नोंदणी नसलेल्या खाजगी रुग्णालयात महिलेची प्रसुतीची शस्त्रक्रिया करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे या डॉक्टरांकडे कोणतीही पदवी नव्हती. वैद्यकीय प्रशिक्षण नसलेल्या दोन तरुणांनी या महिलेवर सिझेरियन शस्त्रक्रिया केली. ज्यामध्ये त्या महिलेला आपला जीव गमवावा लागला.
नेमकं काय घडलं?
प्रियांका नावाच्या एका महिलेला ५ फेब्रुवारी रोजी बासखारी येथील 'नवजीवन हॉस्पिटल'मध्ये प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयाने तिला सिझेरियन शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. ही शस्त्रक्रिया योगेश वर्मा या ३२ वर्षीय कला शाखेचा पदवीधर आणि शुभम विश्वकर्मा (वय १९, १२ वीचा विद्यार्थी) या दोघांनी केली. शस्त्रक्रियेनंतर प्रियांकाने एका मुलीला जन्म दिला. परंतु शस्त्रक्रियेदरम्यान झालेल्या अतिरक्तस्रावामुळे तिची प्रकृती खालावली. तिला भूल दिल्यानंतर ती शुद्धीवरच आली नाही. तिला तातडीने लखनऊच्या रुग्णालयात हलवण्यात आलं, मात्र तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
नक्की वाचा - ऐन महाशिवरात्रीच्या दिवशी शिर्डीत धक्कादायक प्रकार, जमावाकडून व्यक्तीला जबर मारहाण
धक्कादायक प्रकार उघड...
अटक करण्यात आलेला योगेश वर्मा याचे वडील एका आरोग्य केंद्रात वॉर्ड बॉय होते. त्यांच्यासोबत राहून तो किरकोळ वैद्यकीय उपचार शिकला होता. तर शुभम हा केवळ १२ वी पास असून त्याने एका स्थानिक रुग्णालयात काम करण्याचा अनुभव घेतल्याचा दावा केला. खासगी रुग्णालयात सिझेरियन शस्त्रक्रिया महागडी असते. मात्र हे दोघे अवघ्या ३ ते ५ हजार रुपयात सिझेरियन शस्त्रक्रिया करीत होते. त्यामुळे गरीब रुग्ण या रुग्णालयात जात होते. हे रुग्णालय गेल्या ५ वर्षांपासून एका निवासी इमारतीतील चार खोल्यांमध्ये विनापरवाना सुरू होते. तिथे ना कोणती नोंदणी होती, ना अग्निशमन दलाचे प्रमाणपत्र. पोलिसांनी तपास करून दोन्ही आरोपींना अटक केली आहे.