टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडनं (Rahul Dravid) शुक्रवारी बंगळुरुमध्ये मतदान केलं. मतदान करण्यापूर्वी द्रविड त्याचं स्टारडम बाजूला ठेवून सामान्य मतदारांसारखा रांगेत उभा होता. त्यानं मतदान केल्यानंतर सर्वांनी मतदान करावं असं आवाहन मीडियाशी बोलताना सांगितलं. ही संधी फक्त लोकशाहीमध्येच मिळते, असं द्रविडनं सांगितलं. द्रविडचा माजी सहकारी आणि महान भारतीय स्पिनर अनिल कुंबळेनंही शुक्रवारी मतदान केलं. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात कर्नाटकमध्ये 14 मतदारसंघात मतदान झालं.
कर्नाटकात लोकसभेच्या एकूण 28 जागा आहेत. त्या जागांवर दोन टप्प्यात मतदान होतंय. यामध्ये शुक्रवारी 14 जागांवर मतदान झालं. डुपी चिकमंगळूर, हसन, दक्षिण कन्नड़, चित्रदूर्ग, तुमकुर, मांड्या, म्हैसूर, चामराजनगर, बंगळुरु ग्रामीण,बंगळुरु उत्तर, बंगळुरु सेंट्रल, बंगळुरु दक्षिण, चिकबल्लापूर आणि कोलार मतदारसंघात शुक्रवारी मतदान झालं.
2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकनं 28 पैकी 25 जागांवर विजय मिळवला होता. यंदा भाजपा 25 जागांवर निवडणूक लढवत आहे. तर, त्यांचा सहकारी जनता दल सेक्युलकर (जेडीएस) 3 जागांवर निवडणूक लढवतोय. हसन, मांड्या आणि कोलार या तीन मतदारसंघात जेडीएसचे उमेदवार आहेत.
( नक्की वाचा : संजय मांजरेकरनं निवडली T20 वर्ल्ड कपची टीम, विराटसह 3 प्रमुख खेळाडू बाहेर )
लोकसभा निवडणूक यंदा 7 टप्प्यात होत आहे. पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी 21 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात 102 मतदारसंघात निवडणूक झालं. या टप्प्यात 62 टक्क्यांहून जास्त मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली. आता तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी मतदान होणार आहे. तर, सर्व निकाल हे 4 जून रोजी जाहीर होतील.