नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. सत्तारुढ महायुती आणि विरोधातील महाविकास आघाडीमध्ये तीन प्रमुख पक्ष आहेत. सर्वच पक्ष जास्तीत जास्त जागा लढवण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे प्रत्येक जागांसाठी चुरस आहे. सत्तारुढ आणि विरोधी पक्षांमध्ये सध्या जागा वाटपांची चर्चा सुरु आहे. नवरात्रीमध्ये पहिली यादी येईल असा अंदाज होता. पण, अद्याप कोणत्याही पक्षांनी पहिली यादी जाहीर केलेली नाही.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा संभाव्य फॉर्म्युला NDTV मराठीच्या हाती लागला आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला यश मिळालं होतं. त्यानंतर सहा महिन्यांमध्येच होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या कामगिरीची पुनरावृत्ती करुन सत्ता मिळवण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे.
महाविकास आघाडीनं निवडणुकीपूर्वीच मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यांची ही मागणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षांनी फेटाळून लावली. त्यानंतर महाविकास आघाडी निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करणार आहे. ज्या पक्षाला जास्त जागा मिळतील त्या पक्षाचा मुख्यमंत्रीपदावरील दावा प्रबळ होणार असल्यानं जागा वाटपाला महत्त्व प्राप्त झालं आहे.
( नक्की वाचा : 'मुख्यमंत्र्यांचं कार्ट', उद्धव ठाकरेंच्या टीकेला श्रीकांत शिंदेंचं चोख उत्तर )
NDTV मराठीच्या हाती आलेल्या संभाव्य जागा वाटपानुसार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसपक्ष सर्वाधिक जागा लढवणार आहे. त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष असा क्रम आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस 105, उबाठा 95 आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 85 जागा लढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महाविकास आघाडीत विदर्भाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. विदर्भात काँग्रेस 40 जागा लढवणार असल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांनी NDTV मराठीला दिली आहे. पुन्हा एकदा सलग तीन दिवस बैठका घेऊन उर्वरित जागांचा तिढा सोडवला जाईल. त्यानंतर मुंबईच्या जागांवर चर्चा केली जाणार आहे. महाविकास आघाडीची पहिली यादी दसऱ्यानंतर जाहीर केली जाणार आहे.