आजच्या काळात जिथे लहान-सहान गोष्टींवरून भांडणे आणि वाद होतात, तिथे असं एक गाव आहे ज्या गावात गेल्या तीस वर्षापासून एकही गुन्हा झालेला नाही. पोलिस स्टेशनमधील तक्रार दाखल करण्याची फाईल जवळपास तीस वर्षांपासून कोरीच आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे. हे गाव उत्तर प्रदेशच्या हापूड जिल्ह्यात आहे. जिथे गेल्या 30 वर्षांपासून एकही गुन्हा दाखल झालेला नाही. हा काही चमत्कार नसून, रतनगढ गावातील लोकांच्या समजुतीचे आणि शांततेचे हे उत्तम उदाहरण आहे. या गावातील ग्रामस्थ स्वतःच आपापसातील वाद शांततेत मिटवता. त्यामुळे पोलिस फाईलमध्ये एकही तक्रार दाखल होत नाही.
एकही तक्रार दाखल नाही
उत्तर प्रदेशमधील हापूड जिल्ह्यातील गंगा नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या रतनगढ गावात 50 कुटुंबे राहतात. या गावात गेल्या 30 वर्षांपासून पोलिसांकडे एकही तक्रार किंवा FIR दाखल झालेली नाही. गावामध्ये काही वाद झाल्यास, गावातील ज्येष्ठ नागरिक एकत्र बसून तो वाद आपापसांत सोडवतात. या गावातील एकही व्यक्ती व्यसनाधीन नाही. तसेच, गाव 100% साक्षर म्हणून घोषित झाले आहे. येथील बहुतेक लोक नोकरी करतात. त्यामुळे प्रत्येक जण समजूतदार पद्धतीने वागतो. अशा स्थिती गावात भांडण झालं असं कुठे ऐकायला ही भेटत नाही. म्हणूनच हे गाव आदर्श गाव म्हणून ओळखले जाते.
सरपंच पद आजही सर्वोच्च
रतनगढमध्ये आजही सरपंच पदाला सर्वोच्च मानले जाते. बहुतांश लोक त्यांच्या निर्णयाचा आदर करतात. त्यांच्या बोलण्याला मान दिला जातो. याचमुळे या गावामध्ये कोर्ट-कचेऱ्या किंवा पोलिस स्टेशनपर्यंत कोणतेही प्रकरण पोहोचत नाही. गड कोतवालीचे प्रभारी इंस्पेक्टर नीरज कुमार यांनी सांगितले की, रतनगढ हे एक वेगळेच गाव आहे. येथील लोक भांडण करत नाहीत. जरी कधी त्यांच्यात शाब्दिक वाद झाला, तरी गावातील मोठे-ज्येष्ठ लोक एकत्र येऊन तो मिटवतात. पोलीस दप्तरामध्येही या गावातील एकाही गुन्ह्याची नोंद नाही. त्यामुळे आम्ही इतर गावांनाही रतनगढचे उदाहरण देतो.
सर्वांनीच आदर्श घ्यावा असं गाव
सध्या रतनगढ सारखं गाव शोधून ही सापडणार नाही. हे वास्तव आहे. आपण जिकडे जातो तिकडे कुठे ना कुठे भांडण तंटे हे सुरूच असतात. पण रतनगढ गाव त्याला नक्कीच अपवाद आहे. गावकऱ्यांचा समजूतदार पणा, सरपंचाचा शब्द या गोष्टी गावकऱ्यांनी स्विकारल्या आहेत. नुसत्या स्विकारल्या नाहीत तर त्याची अंमलबजावणी ही ते करतात. त्यामुळे हे गाव तंटामुक्त ठरले आहे.